आज 9 एप्रिलला अभिनेत्री स्वरा भास्करचा वाढदिवस आहे. स्वराला तिच्या कुटुंबियांसोबच तिच्या चाहच्यांनी देखील सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. यातच स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वराच्या कुटुंबियांनी तिला सरप्राइज दिल्याचं या व्हिडीओत दिसतंय. कुटुंबाचं प्रेम पाहून स्वराला यावेळी भावना आवरणं कठीण झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.
स्वराने हा व्हिडीओ शेअर करत म्हंटल आहे, “बर्थडे सरप्राईज.. माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्यासोबत काम करणाऱ्यांनी माझ्यासाठी सेलिब्रेशन ठेवलं होतं. ते आधीच केल्यामुळे मला सरप्राइज मिळालं. मी जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती आहे जिला असे आई वडील, कुटुंब आणि मित्र लाभले आहेत. ”
स्वराने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या समोर तीन एक ठेवल्याचं दिसतंय. यावेळी केक कापत असतानाच स्वरा रडायला लागल्याचं दिसतंय. तर अभिनेत्री सोनम कपूरनेदेखील स्वरासोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनमने तिच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे, “प्रिय बहिण,आपण फक्त एक दिवस बोललो आणि माझ्या लक्षात आलं की मैत्री ही देवाने बनवलेली आहे. साक्षी..बिंदीया आणि चंद्रिका ज्या काही भूमिका तू साकारल्यास त्यापेक्षा मला सर्वात जास्त आवडणारी तुझी भूमिका म्हणजे तू ऑफ स्क्रिन जी आहेस ते.” असं म्हणत सोनमने स्वराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.