गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका नेहमी चर्चेत असते. अनेकदा मालिकेतील ट्विस्टमुळे नेटकरी ट्रोल करतात. पण तरीही देखील ‘आई कुठे काय करते’ मालिकेची लोकप्रियता टिकून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या मालिकेत अरुंधतीचा नवा प्रवास पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं अपघाती निधन झाल्याचं दाखवण्यात आलं. तेव्हापासून अरुंधतीचा पुन्हा खडतर प्रवास सुरू झाला आहे. पण या काळात सतत रडून अरुंधतीला खऱ्या आयुष्यात एक आजारा झाला होता. याबाबत स्वतः अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

हेही वाचा – मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली क्षिती जोग, म्हणाली, “ते घातल्याने…”

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नुकतीच ‘मिरची मराठी’च्या ‘गप्पांची मिसळ’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिला सतत एका भूमिकेत राहून होणाऱ्या त्रासाविषयी विचारलं. तेव्हा मधुराणी म्हणाली, “खूप तास काम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिकेतवर होतो. मला हातच राखून काम नाही करता येतं. मी खूप त्या भूमिकेत घुसते. ते चांगलंय का वाईट? हे मला माहित नाही. पण मला कधी-कधी असं वाटतं, आपल्याकडे ती ऑन-ऑफ करण्याची नॅक (कौशल्य) नाहीये का? पण तिच माझी खासियत आहे. मी अशी आहे आणि असंच मला करता येतं.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “आता जो आशुतोष गेल्यानंतरचा ट्रॅक होता. तर मी सलग तीन-चार दिवस बारा तास रडत होते. म्हणजे कन्टिन्यू रडण्याचे सीन्स होते. मग माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. चौथ्या दिवशी मी सकाळी मोबाइलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली. दोन-तीन दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. मला माहित नव्हतं याला व्हर्टिगो म्हणतात. झोपलं की, मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे होत होतं. व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी आठवडाभर काम केलं. आता मी पुन्हा बरी आहे.”

हेही वाचा – Video: दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या मुलाच्या हातावर सजली होणाऱ्या बायकोच्या नावाची मेहंदी, पाहा व्हिडीओ

“पण मी त्यादरम्यान घरी गेले होते. एक-दोन दिवस मला सुट्टी होती. माझ्या बहिणीकडे गेले होते. तिथे आई होती. माझ्या बहिणीला बरं नव्हतं म्हणून मी तिला मदत करायला गेले होते आणि मीच जाऊन झोपले. त्यानंतर मला खूप वाईट वाटलं. मग माझ्या एका मित्राने सांगितलं की, काही प्रमाणत तूही त्या ट्रॉमातून गेली आहेस. भावनिक दृष्ट्या तू तुझ्या प्रवासातूनही त्या गेली आहेस. त्यामुळे तू तुझ्या आईला समजवून सांग की, मला झोप गरजेची होती. मालिकेचं काम करताना तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाही. सतत कन्टिट्यू त्या चक्रात असता. त्यामुळे मला असं वाटतं, सर्व कलाकारांनी कधींना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. आपल्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकायला हवं. हे मी या चार वर्षांच्या अनुभवातून शिकले,” असं मधुराणीने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar got vertigo due to continuous crying scenes pps