‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो आहे. वादविवाद, भांडण आणि नवनवीन टास्कमुळे हा शो प्रेक्षकांना चांगलाच आवडतो. सध्या हिंदी ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन सुरू आहे. हिंदी ‘बिग बॉस’सारखंच ‘बिग बॉस मराठी’ही आहे. ‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत पाच सीझन्स झाले असून, अनेक जण नव्या सीझनची वाट पाहत आहेत.

अनेक चाहत्यांना ‘बिग बॉस’च्या खेळात आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्याची इच्छा असते. अशीच इच्छा एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या चाहत्यांनाही आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी. गौरीच्या अनेक चाहत्यांना तिला ‘बिग बॉस’मध्ये पाहण्याची इच्छा आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला ‘बिग बॉस’मध्ये जाण्याविषयी प्रश्न विचारला आहे.

अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ती शेवटची पाहायला मिळाली होती. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी गौरी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिनं इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तरांच्या सेग्मेंटद्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

या संवादादरम्यान, गौरीच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारला, ज्यात एक प्रश्न ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याविषयीचा होता. गौरीच्या एका चाहत्यानं तिला प्रश्नोत्तरांच्या या सेग्मेंटमध्ये “बिग बॉसमध्ये जायला आवडेल का?” असं विचारलं. त्यावर गौरीनं मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आणि म्हटलं, “मी १२ तास झोपते. ते (बिग बॉस) म्हणतील घरीच झोप.”

गौरी कुलकर्णी इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, गौरी सोशल मीडियावर तिच्या रोजच्या अपडेट्स शेअर करीत असते. तिच्या डेली व्लॉग व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर गौरी कोणत्याही नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. त्यामुळे तिचे अनेक चाहते तिला पुन्हा एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.