गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी यामधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील अरुंधती तर महिलासाठी आयडॉल आहे. अभिनेत्री मुधराणी प्रभूलकरने अरुंधती ही भूमिका उत्कृष्टरित्या पेलली. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. नुकतंच मधुराणी प्रभुलकरने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया॥…अखेर दर्शन घडलं….अगदी शांत आणि निवांत…. ही त्याचीच योजना…अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं… मन भरून आणि भारून गेलं… गदगदून रडू फुटेल की काय असंच झालं…आतून शांत शांत करत गेलं…विठ्ठल विठ्ठल…”, असा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत मधुराणी प्रभुलकरने विठ्ठल मंदिरातील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मधुराणी प्रभुलकर विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेताना पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या गळ्यात तुळशी हार, कपाळावर अष्टगंध लावलेला पाहायला मिळत आहे. शेवटच्या फोटोमध्ये विठ्ठलाची सुंदर मूर्ता दिसत आहे. मधुराणीचे विठ्ठल दर्शनाचे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या मधुराणी प्रभुलकर काय करते?

‘आई कुठे काय करते’ मालिकासंपल्यानंतर मधुराणी प्रभुलकरची ‘आई आणि बाबा रिटायर होतं आहेत’ मालिकेत एन्ट्री झाली होती. स्वीटी आणि मकरंद लग्नात मधुराणी पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता मधुराणी नवं नाटक रंगभूमीवर आलं आहे. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ असं नाटकाचं नाव आहे.

२ मार्चला मधुराणीच्या वाढदिवशी ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी हाउसफुल्ल गर्दी केली होती. याचा व्हिडीओ मधुराणीने सोशल मीडियावर शेअर करत कृतज्ञ व्यक्त केले होते. ती म्हणाली होती, “कृतज्ञ…. निव्वळ कृतज्ञ …’ज्याचा त्याचा विठ्ठल’….’शुभंकर वाट्याला यायचं, तर ओंजळ तर उघडी असायला हवी ना…’डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं आमच्याच नाटकातलं हे वाक्य…’ज्याचा त्याचा विठ्ठल’ या विलक्षण संहितेचा आपण एक भाग असणं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणं ही त्या विठ्ठलाचीच कृपा. मी फक्त ओंजळ उघडी ठेवण्याचा अवकाश होता, हा योग होताच कदाचित. हाउसफुल्ल गर्दीत झालेला खणखणीत प्रयोग, भारावलेली मनं आणि त्या दिवशी मिळालेले अनंत आशीर्वाद…कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला!”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar visit pandharpur pps