Aai Kuthe Kay Karte Fame Actor : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले होते. मालिकेने निरोप घेतला असला तरी, यामधील अरुंधती, अभिषेक, अनिरुद्ध, ईशा, यश, संजना अशी सगळी पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत निरंजन कुलकर्णी याने अरुंधतीच्या मोठ्या मुलाची म्हणजेच अभिषेक देशमुख ही भूमिका साकारली होती. वैयक्तिक आयुष्यात निरंजनने जून महिन्यात लग्नगाठ बांधली. इन्स्टाग्रामवर ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता अभिनेता त्याच्या मालदीव ट्रिपमुळे चर्चेत आला आहे.

निरंजन कुलकर्णी लग्नानंतर आपल्या पत्नीसह मालदीव फिरायला गेला आहे. या ट्रिपचा सुंदर व्हिडीओ अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. निरंजनच्या व्हिडीओमध्ये वॉटर व्हिला, मालदीवचा निळाशार समुद्र याची झलक पाहायला मिळत आहे.

अभिनेता व्हिडीओ शेअर करत लिहितो, “लग्नाआधी आणि लग्नानंतर आमचा प्रवास एकत्र सुरूच आहे… आमची मालदीव ट्रिप खरंच खूप कमाल झाली.” निरंजन मालदीवच्या आलिशान रिसॉर्टमध्ये राहिला होता. याठिकाणी अभिनेत्याने पत्नीसह सुंदर फोटोशूट केल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

निरंजन कुलकर्णीच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं, तर त्याच्या बायकोचं नाव मनीषा गुरम असं आहे. मनीषा ही न्यूट्रिशनिस्ट व लाइफस्टाइल एक्सपर्ट म्हणून काम करते असं तिने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केलं आहे. या दोघांचा विवाहसोहळा गोव्यात पार पडला होता.

दरम्यान, निरंजनच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. याशिवाय अभिनेत्याने स्वत:चा व्यवसाय सुद्धा सुरू केला आहे. ठाण्यात निरंजनचं कॅफे आहे याठिकाणी अनेक कलाकारांनी भेटी दिल्या आहेत.