Abhidnya Bhave Shares Memories Of Usha Nadkarni : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे त्या घराघरांत प्रसिद्ध झाल्या. बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत अभिनय करत उषा नाडकर्णींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

मराठीतील अनेक कलाकारांनी उषा नाडकर्णींबरोबर काम करतानाचे अनुभव किंवा काही किस्से सांगितले आहेत. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञाने ‘खुळता कळी खुलेना’ मालिकेबद्दलची आठवण शेअर केली. तसंच या मालिकेमधील एका सीनदरम्यान उषा नाडकर्णी अभिज्ञा भावेवर ओरडल्या होत्या, असा एक किस्सा अभिज्ञाने सांगितला आहे. नेमका काय आहे किस्सा?

याबद्दल अभिज्ञा असं म्हणाली, “माझे मालिकेत आऊ (उषा नाडकर्णी)बरोबरचे बऱ्यापैकी सीन होते. तर एक सीन होता, ज्यात मला खूप बोलायचं होतं आणि तो सीन लेखकाने अगदी नुकताच लिहून दिला होता. तर त्या सीनआधी मी रात्रीचं काम करून, सेटवरच झोपून मग पुन्हा दुसऱ्या दिवशी चित्रीकरण करत होते. त्यात बाकीचे सीनिअर कलाकार आदल्या दिवशी त्यांच्या वेळेत घरी जाऊन पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या शिफ्टसाठी आले.”

अभिज्ञा भावे इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे अभिज्ञा म्हणाली, “त्या सीनसाठी आऊ समोर बसल्या होत्या आणि मी त्यांच्यासमोर उभी राहून बोलत होते. मी प्रत्येक संवाद वाचून बोलत होते. त्यामुळे आऊ वैतागल्या आणि मला म्हणाल्या, ‘या आजकालच्या मुली… स्क्रिप्ट नाही वाचायची, काही नाही आणि अभिनेत्री बनायल्या आल्यात’ असं म्हणाल्या. खरंतर हे वाक्य माझ्या मनाला लागलं पाहिजे होतं; पण त्यांचं ते बोलणं ऐकून मला हसायला आलं.”

यानंतर तिने सांगितलं, “त्यांचं ते बोलणं ऐकून मी त्यांना सांगितलं की, ‘आऊ मी रात्रभर इकडेच आहे आणि आता मी पुन्हा शूट करतं आहे’. मग आमचे सरसुद्धा म्हणाले की, ‘आऊ ती मुलगी दोन दिवस इकडेच आहे. रात्रभर सीन करतेय. त्यात आता हा नवीन सीन तिला दिला आहे’. त्यानंतर त्याच सीनसाठी मला उषा नाडकर्णी प्रत्येक वाक्य सुचवत होत्या. अशा आहेत आऊ…”

यापुढे अभिज्ञा म्हणाली, “आऊंनी हे वर्षानुवर्षे बघितले असेल की, नुसतं टाइमपास करून स्क्रिप्ट न वाचता सीन करणारे असतात. त्यामुळे मीसुद्धा तशीच असेन असं त्यांना असं वाटलं असेल. पण आऊ परखडपणे व्यक्त होणारी व्यक्ती आहे, अशी व्यक्ती मी पाहिली नाही आणि त्याचे खूप फायदे आहेत. कारण यामुळे कामाची शिस्त राहते आणि लोक तुम्हाला ग्राह्य धरत नाहीत. तिच्या स्वभावाची सुरुवातीला थोडी भीती वाटते; पण त्यांना कळलं की, तुम्ही खरे आहात तर मग त्या अगदी मनमोकळेपणाने बोलतात.”