गणेशोत्सवानिमित्त गेले काही दिवस संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. कोकणात गणपतीच्या सणाला विशेष महत्त्व असतं. मुंबईत राहणारे हजारो कोकणवासी गणपतीच्या दिवसात गावी जातात. गणरायाचं आगमन झाल्यावर कोकणातील घराघरांत बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच भजन, आरती, सत्यनारायण महापूजा आदी कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जातं. कोकणातील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी अनेक मुंबईकर तसेच बाहेरगावचे लोक देखील या दिवसांत कोकणात जातात.
११ दिवस बाप्पाची पूजा केल्यावर पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप दिला जातो. विशेष म्हणजे, कोकणातील विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, बॉलीवूड गाणी वगैरे वाजवली जात नाहीत. गावातील विसर्जन सोहळा कसा असतो याची खास झलक लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारेने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
अंशुमनचं गाव कोकणातील संगमेश्वरमध्ये तुरळ येथे आहे. अभिनेता प्रत्येक सणवाराला पत्नी अन् लेकीसह गावी जातो. त्याचे गावचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होतात. अंशुमन व त्याच्या पत्नीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोकणातील गावच्या विसर्जन सोहळ्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
डीजे किंवा बॉलीवूड गाण्यांवर नव्हे तर कोकणातील विसर्जन मिरवणूक ढोल-ताशाचा गजरात, भजनात दंग होऊन पार पडते. महिलावर्ग यावेळी गरबा खेळतात. मिरवणूक सुरू झाल्यावर गुलाल उधळला जातो, पारंपरिक भजन, गणपती बाप्पाच्या आरत्या म्हटल्या जातात. शेवटी निरोपाची आरती म्हणून गणरायाला निरोप दिला जातो. यानंतर विसर्जन प्रक्रिया जराही गोंधळ न घालता अतिशय पारंपरिक पद्धतीने पार पाडली जाते. बाप्पाचं विसर्जन झाल्यावर सर्वांचेच डोळे पाणावतात.
अंशुमन विचारे व त्याची पत्नी पल्लवी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून हा सोहळा चाहत्यांना दाखवला आहे. “हा खरा मातीतला कलाकार”, “याला म्हणतात विसर्जन…किती सुंदररित्या सर्व पाडलं” अशा कमेंट्स अभिनेत्याच्या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, अंशुमनने ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अशा अनेक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ‘पाहिले न मी तुला’, ‘वस्त्रहरण’ या नाटकांमध्ये देखील अंशुमनने काम केलेलं आहे.