Actress Aditi Dravid Aaji Loves Tharla Tar Mag Serial : ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. अगदी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत प्रत्येकजण प्रचंड आवडीने ही मालिका पाहतात. लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या आजीला देखील सायली-अर्जुनची ही मालिका प्रचंड आवडते. या अभिनेत्रीची आजी या मालिकेची खूप मोठी चाहती आहे.
अभिनेत्री, निवेदिका, गीतकार आणि नृत्यांगना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री अदिती द्रविडने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अदितीच्या आजीने ‘स्टार प्रवाह’कडे एक प्रेमळ मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे. अदिती आणि तिच्या आजीमध्ये फारच सुंदर बॉण्डिंग आहे. अभिनेत्री कायम आजीबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
अदितीची आजी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका रोज पाहते. ती या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. ही मालिका पाहताना खाली मराठी सबटायटल दाखवले जातात. ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका पाहताना सुद्धा खाली मराठी सबटायटल दिसतात… अशी सुविधा इतर मालिकांनाही हवी असं आजीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
अदिती द्रविड या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “ठरलं तर मग’ आजीची आवडती मालिका आहे. पण, आमच्या आजीबाईंची एक प्रेमळ मागणी आहे. ती तुम्ही ऐकाच” या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने ‘स्टार प्रवाह’ आणि ‘ठरलं तर मग’चे निर्माते सोहम व सुचित्रा बांदेकर यांनाही टॅग करून त्यांचे आभार मानले आहेत.
आजी म्हणते, “ठरलं तर मग’ मालिका पाहताना खाली संवाद लिहिलेले दिसतात त्यामुळे आम्हा ऐकू न येणाऱ्या प्रेक्षकांना वाचून मालिका समजते. अशी सुविधा प्रत्येक मालिकेला नाहीये. आमच्यासारख्या बायकांना ज्यांना काहीही ऐकू येत नाही…त्यांना अशाप्रकारे स्क्रिनवर संवाद वाचायला मिळाले तर फार बरं होईल. याचा जरा विचार करावा.”
अदितीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री केतकी पालवने ( ‘ठरलं तर मग’मधील साक्षी ) या व्हिडीओवर, “अगं आजीला मला भेटायचं आहे अदिती…तिला खूप प्रेम” अशी कमेंट केली आहे. तर, अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा “आजी किती गोड आहे”, “वॉव किती गोड” अशा कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.