Aishwarya Sharma On Trolling : सोशल मीडियावर कलाकारांना ट्रोल केलं जाणं हे काय आता नवीन राहिलेलं नाही. अनेक कलाकार सोशल मीडियावरील ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत. त्यात जर कलाकार हे कपल असतील तर दोघांच्या नात्याविषयीही सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा होताना दिसतात. अशाच चर्चा आणि ट्रोलिंगबद्दल प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मानं पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या शर्मानं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आणि फारच कमी वेळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ऐश्वर्या शर्मा आणि नील भट यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटस्फोटाचं कारणं अद्याप समोर आलेलं नाही.
अशातच ऐश्वर्याने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीनं तिच्याबद्दलच्या चुकीच्या वृत्तांबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ऐश्वर्या म्हणते, “लोक माझ्याबद्दल आपापल्या पद्धतीनं मत बनवत आहेत. मी काय केलं आणि मी कोण आहे, याबद्दल समजून न घेता काहीही बोलत आहेत. काही लोक तर ‘हे कर्म आहे’ असंही म्हणतायत. पण, याआधी जे माझ्याबरोबर प्रत्यक्षात काम करत आहेत त्यांच्याशी बोला, माझ्या सहकलाकारांशी बोला, माझ्या निर्मात्यांशी बोला, सेटवरील कोणाशीही बोला आणि त्यांना विचारा की मी कधीही कोणाला त्रास दिलाय का? कुणाची निंदा केलीय का? किंवा कुणाला दुखावलंय का? नाही.. कधीच नाही. सेटवर मी माझं प्रोफेशनलिझम कायम ठेवलं आहे.”
यानंतर ऐश्वर्या सांगते, “जेव्हापासून मी साखरपुडा केलाय, तेव्हापासून मीच सतत ट्रोल होत आहे आणि मी ते हसत-हसत सहन केलं. मला त्रास झाला आहे, पण त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. हे सर्व लोकांना का दिसत नाही? त्याचबरोबर काही अनोळखी लोक मला मेसेज आणि यूट्यूब लिंक पाठवत आहेत, ज्यात माझं नाव काही खोट्या गोष्टींशी जोडलं जात आहे, पण हे खरं नाहीय.”
यानंतर ऐश्वर्या सांगते, “मी शांत राहिले कारण प्रत्येकवेळी जेव्हा मी काही बोलते, तेव्हा लोक माझं एखादं वाक्य चुकीच्या पद्धतीनं घेतात. फुकटच्या प्रसिद्धीसाठी माझं नाव वापरतात आणि ते पुन्हा असंच करणार. पण, मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की मी चुकीची आहे, त्याचा अर्थ फक्त इतकाच आहे की मी नकारात्मकता पसरवू इच्छित नाही.”
पुढे तिनं स्पष्ट मत व्यक्त करीत म्हटलं, “मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते, मी कधीही कोणाला त्रास दिला नाही. जे लोक खोटी माहिती पसरवत आहेत त्यांना त्यांच्या कर्माचा विचार करायला हवा. तुम्ही मानसिक आरोग्याबद्दल बोलता… पण, कोणाबद्दलही काही चुकीचं बोलण्याआधी विचार करा. काही लोक शांत राहण्याचा निर्णय घेतात आणि मीसुद्धा तेच केलं आहे. पण मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता, मी माझ्या स्वाभिमानासाठी स्वत: उभी राहीन.”
