Marathi Actress Madhuri Pawar Dance Video : मराठी इंडस्ट्रीत सक्रिय असणारे अनेक कलाकार कामानिमित्त, विविध शोसाठी किंवा फिरण्याची आवड म्हणून परदेश भ्रमंती करतात. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी युरोपियन मराठी संमेलनाच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये गेली होती यावेळी अभिनेत्रीने मराठमोळा लूक करून “मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज” या व्हायरल कवितेवर ठेका धरला होता. सोनालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. आता आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुबईत जाऊन सदाबहार मराठी गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री माधुरी पवार कामानिमित्त दुबईला गेली आहे. यावेळी अभिनेत्रीने प्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीला भेट दिली. माधुरीने बुर्ज खलिफाजवळ मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माधुरी पवार डान्स करताना तिच्या मागे बॅकग्राऊंडला चाहत्यांना भव्य बुर्ज खलिफा इमारतीची झलक पाहायला मिळत आहे.
माधुरीने दुबईत “अश्विनी ये ना…” या सदाबहार मराठी गाण्यावर ठेका धरला आहे. हे गाणं सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्या ‘गंमत जंमत’ सिनेमातील असून किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गाणं गायलं आहे.
माधुरी डान्स व्हिडीओ शेअर करत याला “बुर्ज खलिफा आणि मराठी गर्व…दोन्ही उंचच” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आपली मराठी अभिनेत्री माधुरी खूपच छान”, “आमची माधुरी ताई भारीच डान्स करते”, “काय कमाल डान्स केलाय” अशा प्रतिक्रिया माधुरीच्या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, माधुरी पवारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत ‘निक्की’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री १० वाजता प्रसारित केली जात असून यामध्ये विशाल निकम, पूजा बिरारी, संग्राम साळवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.