Prajakta Gaikwad : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची गुडन्यूज सर्वांबरोबर शेअर केली आहे.
प्राजक्ताने लग्न ठरल्याची बातमी जाहीर केल्यावर तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाची हिंट सर्वांना दिली होती. अभिनेत्रीने जून महिन्याच्या सुरुवातीला पिवळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिलं होतं. यामध्ये प्राजक्ताने “इंजिनिअर झाल्यावर जॉब कधी लागणार आणि वयात आल्यावर लग्न कधी करणार? हे ठरलेले प्रश्न असतात” असं म्हटलं होतं. याशिवाय अभिनेत्रीने त्या फोटोंवर ‘पाहुणे मंडळी’ हा हॅशटॅग देखील वापरला होता. तेव्हा सुद्धा अभिनेत्रीला चाहत्यांनी “तुझा नवरा कोण आहे, लग्न करतेस का” असे प्रश्न विचारले होते.
आता अखेर ‘ठरलं’ असं जाहीर करत प्राजक्ताने नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीने सुंदर साडी नेसून गळ्यात फुलांचा सुंदर हार, हातात चुडा, नाकात नथ, केसात गजरा असा पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. यातील एका फोटोमध्ये लग्न ठरल्यावर प्राजक्ताची पहिल्यांदाच ओटी भरल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये प्राजक्ता नमस्कार करून सर्वांचा आशीर्वाद घेताना दिसतेय. यावेळी फोटोमध्ये दिसणाऱ्या तिच्या हातातील सुंदर अंगठीने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने या फोटोंना, “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा…#ठरलं” असं कॅप्शन दिलं आहे.
प्राजक्ताने लग्न ठरल्याचं जाहीर करताच नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर, मेघा धाडे, कार्तिकी गायकवाड, सावनी रविंद्र अशा अनेक सेलिब्रिटींनी प्राजक्ताला कमेंट्स करत तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर प्राजक्ता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रिय झाली. तिने यामध्ये महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. आतापर्यंत तिने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.