Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding: सध्या एकापाठोपाठ एक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहे. नुकतंच २४ फेब्रुवारीला अभिनेता प्रथमेश परबने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आज ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्न करून तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेने काल, २५ फेब्रुवारीला साखरपुडा केला. त्यानंतर दोघांना हळद लागली आणि अखेर आज दोघं लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – पाच महिनेही पूर्ण न होता ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कोणती ते जाणून घ्या…

तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी उपस्थित लावली होती. अभिनेते मिलिंद गवळी, ऋतुजा बागवे, अमोल बावडेकर, भक्ती रत्नपारखी, अनघा अतुल असे अनेक कलाकार या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. तसेच ‘बिग बॉस १७’ मधील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट यांनी देखील तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाला हजेरी लावली होती. याचे फोटो ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

“एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले… लग्नाच्या मनापासून शुभेच्छा,” असं कॅप्शन लिहित ऐश्वर्याने तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघं नवविवाहित जोडप्याबरोबर पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – ना ऋषी ना रणबीर, भट्ट कुटुंबातील ‘या’ सदस्यासारखी दिसते राहा कपूर, आलियाच्या वडिलांनी केला खुलासा

दरम्यान, तितीक्षा व सिद्धार्थने लग्नासाठी खास पेस्टल रंगाची निवड केली होती. अभिनेत्रीने ऑफ व्हाइट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. दोघं या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.