Kaun Banega Crorepati Season 17 : टीव्हीवरील काही लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे; त्याचबरोबर अनेकांच्या ज्ञानातही भर घालत आहे. या कार्यक्रमात येणारे अनेक स्पर्धक त्यांची काही स्वप्नं घेऊन येतात आणि या मंचाद्वारे आपल्या स्वप्नपूर्तीचा प्रवास करतात. अशातच या शोचा नवा सीlझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि साहजिकच या पर्वाचं सूत्रसंचालन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन करत आहेत.

आजपासून (११ ऑगस्ट) ‘कौन बनेगा करोडपती’चा नवा आणि १७ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सीझनचे अनेक प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. अशातच आता सोनी टीव्हीने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक नाही, तर दोन अमिताभ बच्चन दिसत आहेत. या व्हिडीओसह असं म्हटलं आहे की, जेनरशन X असो किंवा जेनरेशन Z, शो त्याच जुन्या, आपल्याला परिचित शैलीत सादर केला जाईल – कारण हीच परंपरा आणि आपली सांस्कृतिक ओळख हे या शोचं खरं वैशिष्ट्य आहे.

या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे दुहेरी भूमिकांत दिसत आहेत, ज्यापैकी एक अमिताभ बच्चन आरशासमोर बसून कार्यक्रमाची रिहर्सल करत आहेत आणि दुसरे अमिताभ रिहर्लस करणाऱ्या अमिताभ यांचं चेष्टेने निरीक्षण करत आहेत. तेव्हा दुसरे बिग बी जुन्या आरशासमोर बसून रिहर्सल करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना म्हणतात, “आता काळ बदललाय, शोमध्येही काहीतरी नवं असायला हवं.” त्यावर जुन्या शैलीतील बिग बी उत्तर देतात – “भाषा, बोलणं व संस्कृती हीच या शोची खरी ओळख आहे.”

‘कौन बनेगा करोडपती’साठी हे वर्ष खूपच खास आहे. कारण- हा शो रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे. हा शो सुरू होऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही हा प्रवास सुरूच आहे. त्यामुळे हा १७वा सीझन भारतीय टेलिव्हिजनमधील सर्वांत संस्मरणीय पर्व ठरणार असल्याचं मत निर्मात्यांनी व्यक्त केलं आहे

‘कौन बनेगा करोडपती १७’ शोचा प्रोमो

तसंच ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीझनबद्दल सांगायचं झालं तर, यंदाच्या नव्या पर्वात सर्वात मोठी बक्षीस रक्कम सात कोटी रुपये आहे. तर शोचं स्वरूप (फॉरमॅट) नेहमीप्रमाणेच असणार आहे – ज्यात स्पर्धकांना बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिले जातील. अडचणीच्या वेळी स्पर्धक ५०:५०, ऑडियन्स पोल आणि व्हिडीओ कॉल टू फ्रेंड अशा लाइफलाइन्सचा वापर करू शकतात.

दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती – सीझन १७’ आ, म्हणजेच ११ ऑगस्ट २०२५ पासून दररोज रात्री ९ वाजता Sony TV वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या नव्या पर्वात अमिताभ बच्चन काय जादू करणार? याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.