Ankita Walawalkar : ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. अंकिता सोशल मीडियावर अनेकदा सामाजिक विषयांवर आपली स्पष्ट मत मांडताना दिसते. तिने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे. नांदगाव येथील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे पण, या गेटच्या परिसरात सर्वत्र कचरा करण्यात आला आहे. हे अतिशय अयोग्य आहे असं सांगत अंकिताने तिच्या पोस्टमध्ये संताप व्यक्त केला आहे.

अंकिता म्हणते, “गेटवर नाव महाराजांचं… पण, समोरचं दृश्य लाजिरवाणं! एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो आपल्या आजुबाजूच्या जागांमध्येही असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते. परंतु आज अनेक ठिकाणी “शिवाजी महाराज चौक”, “शिवाजी महाराज गेट” अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती अनेकदा घाण, कचरा केलेला दिसतो… हे निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र आहे. किती विसंगती आहे ही– एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळ साचलेला कचरा… हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचंही द्योतक आहे.”

अंकिता पुढे म्हणाली, “शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरं अनुकरण आहे. मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू – तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का? आज गरज आहे ती फक्त ‘शिवप्रेम’ बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची.”

“गेटवर महाराजांचं नाव, पण समोर कचरा – हा अपमान नाही का आपल्या इतिहासाचा?” आपण जर खरंच शिवरायांवर प्रेम करत असू, तर त्यांच्या नावाने असलेल्या प्रत्येक स्थळाला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ आणि सन्माननीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. समाज, नगरपालिका आणि स्थानिक नागरिक – सर्वांनी मिळून हे लक्षात घ्यायला हवं. शिवरायांचं नाव म्हणजे शौर्य, स्वच्छता आणि स्वाभिमान. तो आपल्या कृतीनं दाखवूया!” असं अंकिताने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ या परिसरातील व्हिडीओ शेअर करत सांगते, “सोशल मीडियावर जर कोणी म्हटलं की, शिवाजी पार्कला हा इव्हेंट होतोय तर आपण त्यांना रागात म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणा…कारण, आपल्या प्रत्येकाच्या मनात महाराजांबद्दल एक अभिमान आहे. पण, खरोखर आपण ते जपतोय का? हे आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार…नांदगाव, इथे असा कचरा केलाय. मला एक सांगा आज महाराज असते तर, ते आज या प्रवेशद्वारातून येऊ शकले असते का? आपण त्यांना येऊ दिलं असतं का? ज्याठिकाणी आपण इतिहासाचं नाव लावतोय जर त्याठिकाणचं सौंदर्य आपल्याला राखता येत नसेल तर, ते नाव लावताय कशाला? आता जे मला सांगतील की, हे तू जाऊन साफ कर त्यांना मला एकच सांगायचंय…कचरा न करणं, कचरा होऊ न देणं आणि ज्याठिकाणी महाराजांचं नाव लागतंय त्या जागेचं पावित्र्य जपणं हीच खरी शिवप्रेमींची ओळख आहे. जर, हे जमत नसेल तर त्याठिकाणी महाराजांचं नाव वापरूच नका. गेले काही दिवस मी रोज हे सगळं पाहतेय. पण कोणी काहीच करत नाहीये. महाराजांच्या नावाने असलेल्या गेटसमोर अशाप्रकारे कचरा करणं अतिशय चुकीचं आहे. खरंच आपण सर्वांनी याचा विचार करावा अशी ही गोष्ट आहे. स्वतः कचरा टाकू नका आणि इतरांना कचरा करायला देऊ नका – हीच शिवप्रेमाची खरी ओळख. -२७/०७/२०२५”

दरम्यान, अंकिताचा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी देखील तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. “मांडलेला मुद्दा एक नंबर आहे…पटलं मला, आपण महाराजांच्या नावासाठी भांडतो पण, आपण त्याचप्रमाणे त्यांचं नाव जपलंही पाहिजे.” अशा प्रतिक्रिया अंकिताच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.