Amit Rekhi-Shivani Naik Engagement : ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर जवळपास ३ वर्षे सुरू होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईकने प्रमुख भूमिका साकारली होती. तिला सगळे या सिरियलमध्ये प्रेमाने ‘अप्पी’ म्हणायचे. आता प्रेक्षकांच्या लाडक्या अप्पीला अखेर खऱ्या आयुष्यातील अर्जुन सापडला आहे. शिवानी नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचा होणार पती नेमका कोण आहे याबाबत जाणून घेऊयात…
लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईकचा साखरपुडा आज ( २६ ऑक्टोबर ) थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्री येत्या काही दिवसांत लोकप्रिय मराठी अभिनेता अमित रेखीशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शिवानी आणि अमित यांनी साखरपुड्याला पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसली होती. तर, अमितने यावेळी ऑफ व्हाइट रंगाचा सदरा घातला होता. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
शिवानीचा होणारा पती अमितबद्दल सांगायचं झालं तर, त्याने आजवर विविध मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतून तो प्रसिद्धीझोतात आला. यानंतर त्याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत मकरंदची भूमिका साकारली. सध्या अमित ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
दरम्यान, अमित आणि शिवानी आता लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. मराठी कलाविश्वातून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
