स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदावर नाव कोरले; तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला. मुनव्वरने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकली. मुनव्वरने ही ट्रॉफी जिंकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ‘बिग बॉस १७’चा विजेता ठरलेल्या मुनव्वरने ५० लाख रुपये आणि एक क्रेटा कार जिंकली आहे. आता या नव्या कारमधून मुनव्वर कोणत्या मुलीला फिरायला घेऊन जाणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. खुद्द सलमान खानने यासाठी त्याला एका मुलीचे नावही सुचवले आहे.

‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सलमानने मुनव्वरला नवीन कारमधून कोणाला घेऊन जाणार, असा प्रश्न विचारला. एवढेच नाही तर सलमाननेच त्याला तुझ्या बहिणींना नवीन कारमधून फिरायला घेऊन जा, असा सल्लाही दिला. त्यामुळे आता मुनव्वर आपल्या नव्या कारमधून बहिणींना की आणखी कोणाला फिरायला घेऊन जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यानंतर मुनव्वरने सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअर केली आहे. या फोटोमध्ये मुनव्वरने ट्रॉफी पकडल्याचे आणि त्याच्या बाजूला सलमान खान उभा असल्याचे दिसून येत आहे. हा फोटो शेअर करीत त्याने लिहिले, खूप खूप आभार जनता! तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीला आलीच. मार्गदर्शनासाठी मोठे भाऊ सलमान खान यांचे विशेष आभार!

हेही वाचा- “आयुष्यात तुम्हाला…”, आयशा खानबद्दल मुनव्वर फारुकीची पहिली प्रतिक्रिया; तिने Bigg Boss 17 मध्ये केलेले गंभीर आरोप

‘बिग बॉस १७’च्या सर्वोत्तम पाच जणांमध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी यांचा समावेश होता. या स्पर्धेतून सगळ्यात पहिल्यांदा अरुण माशेट्टी बाद झाला. त्यानंतर अंकिता व मनारा चोप्रा बाहेर पडल्या. अभिषेक व मुनव्वर यांच्यात अखेरचा सामना रंगला अन् मुनव्वरने ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकली.