Bigg Boss 19 Fame Actress On Kashmir : ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. रविवारी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे फरहान भट्ट. फरहानने ‘लैला मजनू’, ‘नोटबुक’ आणि ‘सिंघम अगेन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं असलं, तरी तिचा विश्वास आहे की, ‘बिग बॉस १९’ हा शो तिला आणखी ओळख आणि प्रसिद्धी मिळवून देईल.
इंडिया टुडेशी साधलेल्या संवादात तिने ‘बिग बॉस १९’ हा शो स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं. याबद्दल ती म्हणाली, “सर्वात पहिलं म्हणजे, माझ्या प्रगतीसाठी हा शो उपयुक्त आहे आणि दुसरं म्हणजे, जगाला हे समजायला हवं की, माझ्यासारखी एक व्यक्तीही अस्तित्वात आहे.” यानंतर तिने या शोबद्दल ती पूर्वी फारशी उत्साही नव्हती, हेही कबूल केलं.
याबद्दल फरहान म्हणाली, “मी याआधी ‘बिग बॉस’ची चाहती नव्हते, कोणता स्पर्धक किंवा कोणताही सीझन माझा आवडता नाही. पण यावर्षीचा थीम, जी थोडीशी राजकारण आणि लोकशाही संबंधित आहे. ही थीम जणू खास माझ्यासाठीच तयार केली आहे असं वाटलं. जेव्हा मला या थीमबद्दल कळलं, तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला ‘हे माझ्यासाठीच केलं आहे का?’ कारण हे माझ्या व्यक्तिमत्तवाला साजेसं आहे.”
यानंतर तिने काश्मीरविषयी तिचं मत व्यक्त केलं. काश्मीरबद्दल नेहमीच नकारात्मक बातम्या चर्चेत येत असल्याबद्दल फरहान म्हणते, “लोकांमध्ये ज्या गैरसमजुती आहेत, त्या दूर करणं हे माझं कर्तव्य आहे. आजवर या शोमध्ये काश्मीरशी संबंधित अनेक स्पर्धक आले, पण ते सगळे मुंबईत राहणारे होते. मी मात्र थेट काश्मीरच्या खोऱ्यातून इथं आलेली आहे. मी काश्मीर आणि इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करते. ही माझी जन्मभूमी आहे.”
यानंतर ती म्हणाली, “मी सत्य लपवणार नाही आणि लपवायची इच्छाही नाही. पण मी माझ्या परीने काश्मीरची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या काही वर्षांत काश्मीरने खूप काही सहन केलं आहे – आणि तेही बहुतांश वेळा बाहेरून आलेल्यांमुळे. त्यामुळे मी इथं काही बदल घडवू शकले, काही स्पष्टता देऊ शकले, तर ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी हे आधीही वेगवेगळ्या माध्यमातून करत आले आहेच.”
दरम्यान, ‘बिग बॉस’ सुरू होताच पहिल्याच आठवड्यात फरहानाला घरातून बेघर करण्यात आलंय. फरहानाला ‘सीक्रेट रूम’मध्ये पाठवण्यात आलं आहे. सीक्रेट रूममध्ये बसून फरहाना आता घरातील इतर सदस्यांची प्रत्येक हालचाल, प्लॅनिंग व स्ट्रॅटेजी बारकाईने पाहू शकते. ज्याचा तिला तिच्या पुढील खेळासाठी नक्कीच फायदा होईल.