Bigg Boss 19 Updates : ‘बिग बॉस १९’ हा शो सलमान खानचा शो सध्या प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या शोला आता हळूहळू रंगत चढू लागली आहे. ‘बिग बॉस’ आणि त्यातील भांडणं किंवा वादविवाद काही नवीन नाहीत. प्रत्येक सीझनमध्ये घरात भांडणं आणि वादविवाद होत असतात. अशातच गेल्या आठवड्यात प्रणित मोरे, बसीर अली आणि अमाल मलिक या तिघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली होती.

प्रणित, अमाल आणि बसीरमधील या वादादरम्यान, बसीरने प्रणितला ‘तू तुझ्या गावाकडे जा’ असं म्हटलं होतं. बसीरच्या याच वक्तव्याचा सलमान खान चांगलाच समाचार घेतला. ‘बिग बॉस १९’ मध्ये नुकताच ‘वीकेंड का वार’ पडला. यावेळी सलमान खानने बसीरच्या ‘प्रणित मोरे, तू तुझ्या गावाला परत जा’ या विधानाबद्दल त्याला खडेबोल सुनावले.

‘वीकेंड का वार’मध्ये ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक गौहर खानही सहभागी झाली होती. तिने अमाल आणि बसीर यांना त्यांच्या भाषेबद्दल सुनावलं. तेव्हाच सलमाननेही गौहरशी सहमती दर्शवली आणि बसीरला धारेवर धरलं.

गौहर म्हणाली, “बसीरने प्रणितला ‘तू तुझ्या गावाला परत जा’ असं म्हटलं. मला असं सांगायचं आहे की, आपल्याकडे वीज, अन्न आणि इतर जे काही आहे ते सगळं आपल्या देशातील गावांमुळेच आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा.”

सलमाननेही या मुद्यावर आपलं मत मांडलं, “आपण सगळे गावातून आलोय, त्यात काहीही वाईट नाही. प्रणित तर गावाचा नाही, पुण्याचा आहे. मग तु त्याला गावचा कसं म्हणालास? प्रणितने ही गोष्ट छान हाताळली आणि त्याने आपली मर्यादा ओलांडली नाही.”

दरम्यान, सलमानने प्रणितची बाजू घेताच त्याला अश्रु अनावर झाले. तसंच चाहत्यांनीसुद्धा सलमानच्या या कृतीबद्दल कौतुक केलं. बसीरने साऱ्या मर्यादा ओलंडत प्रणितवर टीका केली होती. याबद्दल बिग बॉस मराठी ५ मधील धनंजय पोवार, अंकिता वालावलकर तसंच निक्की तांबोळीने सुद्धा प्रणितला पाठिंबा दर्शवला होता.