Zeishan Quadrri Talk About Tanya Mittal : ‘बिग बॉस’च्या १९ व्या सीझनमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सहभागी झाले आहेत. हे सगळेच स्पर्धक सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. मात्र, शोमधील एका स्पर्धकाची पहिल्या दिवसापासूनच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे तान्या मित्तल. ग्वाल्हेरची उद्योजक, इन्फ्लुएन्सर व मॉडेल म्हणून तान्या सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे.
‘बिग बॉस’मध्ये ती ५०० पेक्षा जास्त साड्या, ५० किलो दागिने आणि स्वतःचे चांदीचे भांडे व बाटली घेऊन गेली आहे. तसंच तिनं कॉफी पिण्यासाठी ग्वाल्हेरहून आग्र्याला जात असल्याचंही म्हटलं होतं. तसंच तान्यानं तिची बिस्किटं लंडनहून येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे. तसंच तान्या हे सगळं खोटं बोलत असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
अशातच ‘बिग बॉस’मधीलच एका स्पर्धकानं तान्याबद्दल खरं-खोटं सांगितलं आहे. झीशान कादरीनं तान्याच्या वागणुकीबद्दल प्रतिक्रिया दिली. ‘बिग बॉस १९’मधून बाहेर पडल्यानंतर झीशान कादरीनं त्याच्या तान्याबरोबरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.
टेली टॉक इंडिया या माध्यमाशी संवाद साधताना झीशाननं तान्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया आणि आरोपांवर उत्तर दिलं. तो म्हणाला, “जे लोक म्हणतायत की, तान्या खोटं बोलतेय, ते बारकाईनं निरीक्षण करीत आहेत आणि त्यातूनच त्यांना समजतंय की, ती खरं बोलतेय की खोटं. “मी शोमधून बाहेर पडत होतो तेव्हा तान्या मला भेटली नाही आणि याचं मला खूप वाईट वाटलं. मी तिला आधीच सांगितलं होतं की, तू घरात जे काही बोलशील, मग ते खरं असो की खोटं… त्यावर तुला बाहेर जाऊन उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे स्पष्टपणे बोल.”
पुढे झीशान म्हणाला, “मी जेव्हा घरात होतो तेव्हा माझी आणि तान्याची छान बाँडिंग होती. जेव्हा मला १०३ डिग्री ताप होता, तेव्हा तान्या आणि शहबाजने माझी खूप काळजी घेतली. पण जेव्हा मालती चहर वाइल्ड कार्ड म्हणून घरात आली, तेव्हा तान्यानं मला चिडवलं की, आता तुला नवीन बहीण मिळाली आहे. त्यावरून आमच्यात बाचाबाचीही झाली होती.”