Tejasswi Prakash Started New Business : तेजस्वी प्रकाश हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये मुख्य नायिकांची भूमिका साकारली आहे. तेजस्वी प्रकाशने एकता कपूरच्या ‘नागिन’ सारख्या बहुचर्चित मालिकेतही मुख्य भूमिका साकारली आहे, तर तिने अनेक रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. अशातच आता अभिनेत्री एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे.
तेजस्वी प्रकाशने हिंदी टेलिव्हिजनवरील ‘सिलसिला बदलते रिश्तो का’, ‘रिश्ता लिखेंगे हम नया’, ‘पेहरेदार पिया की’, ‘स्वारागिनी’, ‘नागीण’ यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य नायिकांच्या भूमिका साकारल्या आहेत; तर तिने ‘सेलिब्रिटी शेफ’ आणि ‘बिग बॉस’मध्येही सहभाग घेतला होता. तेजस्वी ‘बिग बॉस १५’ची विजेती ठरली होती. यासह तिने ‘मन कस्तुरी रे’, ‘स्कुल कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचा तिथे मोठा चाहतावर्गही आहे.
तेजस्वी प्रकाशने सुरू केला ‘हा’ व्यवसाय
तेजस्वी प्रकाशने अशातच आता अभिनयासह अजून एका क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहे. म्हणजेच तिने तिचा स्वत:चा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तेजस्वीने स्वतःचं सॅलाँन सुरू केलं आहे, त्यामुळे आता अभिनेत्री असण्यासह ती उद्योजिकाही झाली आहे. तिने हा व्यवसाय सुरू करण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
तेजस्वीने भारती सिंहशी संवाद साधताना नवीन व्यवसाय सुरू करण्यामागचं कारण सांगितलं आहे. यावेळी तिने ती अभिनय क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही, म्हणून तिने हा व्यवसाय सुरू केल्याचं म्हटलं आहे. यावेळी भारतीने तिला टेलिव्हिजन आणि चित्रपटांत काम करता करता बिझनेस वुमन होण्याचा विचार कसा आला असं विचारलं. यावर ती म्हणाली, “मला अभिनय खूप आवडतो. अनेक लोकांना एकत्र अनेक गोष्टी आवडत असतात. पण असं गरजेचं नाही की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्यांनाही तुम्ही आवडावंच.”
तेजस्वी पुढे म्हणाली, “मी आता जे काही थोडं फार काम करत आहे ते छान सुरू आहे. पण, मला असं वाटतं की मी पूर्णपणे अभिनय क्षेत्रावर अवलंबून राहू शकत नाही.” तिने यावेळी जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा देव तुम्हाला साथ देतो असं सांगितलं आहे. तेजस्वी याबद्दल म्हणाली, “आता माझा एक नवीन प्रवास सुरू झाला आहे. मी एक चांगला व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.”
