ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शुक्रवारी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. त्यानंतर बराच गदारोळ पाहायला मिळाला. काल शनिवारी न्यायालयाने जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर केला. जितेंद्र आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावर नुकतंच बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या एका अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या पर्वातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यातूनच प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून पराग कान्हेरेला ओळखले जाते. पराग हा एक प्रसिद्ध शेफ आहे. सध्या तो त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्यात त्याने अप्रत्यक्षरित्या जितेंद्र आव्हाड आणि अभिनेत्री केतकी चितळे यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

पराग कान्हेरेची पोस्ट

“एका राजकीय पक्षाच्या नेत्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल एका मराठी अभिनेत्रीला अटक करण्यात आली. 42-45 दिवस तिला तुरुंगात टाकण्यात आले. अनेक प्रयत्न करूनही तिला जामीन मिळाला नाही.
एका राजकीय नेत्याने मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण केली, अटक झाली…..आणि एका दिवसात जामीनही मंजूर..?
त्या सामान्य नागरिकाने चित्रपटाचे तिकीट काढले होते..
चित्रपट कोणाचा? कोणी आक्षेप घेतला? आणि कोणाला त्रास होतो ते पहा
त्यामुळे राज्यात सरकार कुणाचेही असो, कर भरणाऱ्या नागरिकांसाठी कायदा वेगळा आणि राजकारण्यांसाठी कायदा वेगळा… जय महाराष्ट्र”, असे पराग कान्हेरेने म्हटले आहे.

दरम्यान त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. परागच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने थेट प्रश्न विचारला आहे. ‘संजय राऊत १०० दिवस तुरुंगात होते, नवाब मलिक आणि अनिल देशमुख अजूनही तुरुंगात आहेत. तुमच विधान चुकीचे आहे’, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यावर परागने त्याला प्रतिक्रिया दिली आहे.

पराग कान्हेरेची कमेंट

“अरे किती sad…. ते नवाब मलिक आणि अनिल देशमुख अजूनही तुरुंगात आहेत? …. अरेरे… बाकीचा करही मी भरेन…जेणेकरून त्यांनाही जामीन मिळेल”, अशी खोचक कमेंट परागने केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 2 contestant parag kanhere facebook post goes viral talk about ketki chitale and jitendra awhad nrp