Bigg Bioss Marathi Fame Dhananjay Powar : रीलस्टार व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख असलेला धनंजय पोवार ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरांत लोकप्रिय झाला. कोल्हापुरच्या डीपी दादाला ‘बिग बॉस’च्या घरात चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. यामुळे डीपीला महाअंतिम सोहळ्यापर्यंत बाजी मारता आली होती.
सध्या धनंजय पोवार त्याच्या नव्या व्यवसायामुळे चर्चेत आला आहे. डीपीने स्वत:चा गॉगल व चष्म्याचा ब्रँड सुरू केला आहे. या नव्या व्यवसायाबाबत त्याने पोस्ट शेअर करून सर्व चाहत्यांना माहिती दिली आहे. या पोस्टवर एका नेटकऱ्याने टीकात्मक कमेंट केली होती. “तुम्ही फेमचा वापर करून दुसऱ्यांचा व्यवसाय बंद पाडण्याच्या तयारीत आहात, स्वतःच्या स्वार्थासाठी असं करत आहात” असं या नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे. याचा स्क्रीनशॉट धनंजयने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत संबंधित नेटकऱ्याला स्पष्ट उत्तर दिलं आहे. तसेच मी कधीच स्वत:चा विचार करत नाही, कायम सर्वांना माझ्याबरोबर घेऊन चालतो असंही धनंजयने या नेटकऱ्याला प्रत्युत्तर देताना लिहिलं आहे.
धनंजयला त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात व्होटिंग केलं होतं. याशिवाय डीपीला व्होट करावं यासाठी अनेक चाहत्यांनी प्रेक्षकांना आवाहनही केलं होतं. यावरून नेटकरी म्हणतो, “तुम्ही जेव्हा ‘बिग बॉस’मध्ये होता, तेव्हा लोकांनी तुमच्यासाठी मतदान करण्यासाठी निःस्वार्थपणे गॉगल आणि चष्मे वाटले. त्यावेळी त्या लोकांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. त्यांनी फक्त तुमच्यासाठी मतं गोळा केली. पण, आता तुम्ही त्यांचा व्यवसाय बंद पाडण्याच्या तयारीत आहात. व्यवसाय करा, पण असे कमी दर लावून चष्मे विकू नका. फेमचा वापर करून कोणाच्या व्यवसायाची वाट लावणं हा चुकीचा प्रकार आहे. लोकांनी तुम्हाला निःस्वार्थपणे मतं दिली आणि तुम्ही मात्र आता स्वतःच्या स्वार्थासाठी असं करत आहात. हे चुकीचं आहे.”
नेटकऱ्याच्या या कमेंटवर धनंजयने स्पष्ट शब्दांत उत्तर देत आपली बाजू सांगितली आहे. “साहेब, ज्या व्यक्तीने आमच्या गावी हा उपक्रम राबवला. त्या लोकांना घेऊनच मी या व्यवसायात आलो आणि सर्वात म्हत्वाची गोष्ट माझ्यापेक्षाही जास्त टक्के हिस्सा मी त्यांना देऊन त्या सगळ्यांना एकप्रकारे मदत करतोय आणि त्यांच्यासह मी सुद्धा मोठा होतोय. सगळ्यांना आपल्याबरोबर नेण्याची सवय आहे माझी…स्वार्थासाठी कोणाच्या पाठीत वार करणं आयुष्यात कधीच जमलं नाही. आम्ही प्रत्येकाला आमच्याबरोबर घेऊन मोठे होतो…संपलो तरी ‘सोबत’, मोठे झालो तरी ‘सोबत’!” असं स्पष्ट उत्तर धनंजयने टीका करणाऱ्या नेटकऱ्याला दिलं आहे.
दरम्यान, धनंजयच्या पोस्टवर अन्य चाहत्यांनी, “असाच पुढे जात राहा.. हीच ज्योतिबा आणि महालक्ष्मी चरणी प्रार्थना”, “मराठी उद्योजक फुल सपोर्ट” अशा प्रतिक्रिया देत त्याला नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.