Zee Marathi Show Chala Hawa Yeu Dya : ‘झी मराठी’ वाहिनीवर जवळपास १० वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ हा रिअ‍ॅलिटी शो सुरू होता. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांत या शोने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. मार्च २०२४ मध्ये या शोमधील कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला होता. कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम या कलाकारांच्या पोस्टवर आजही अनेक चाहते “आम्ही शोला मिस करत आहोत” अशा कमेंट्स करतात. या सगळ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे.

वर्षभराच्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा शो केव्हा व कधी सुरू होणार याची अधिकृत घोषणा वाहिनीकडून अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच हा शो नव्याने सुरू होईल अशी माहिती चॅनेल ऑफिसरकडून देण्यात आली आहे. याशिवाय ‘झी मराठी’ला यंदा २६ वर्षे पूर्ण होत असल्याने वाहिनीचा लूक, यावर सुरू असणाऱ्या मालिकांचे मोंटाज देखील बदलण्यात आले आहेत.

श्रेया बुगडे आणि गौरव मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच ‘चल भावा सिटीत’च्या रंगमंचावर उपस्थित राहून लवकरच काहीतरी नवीन सर्वांसाठी घेऊन येणार आहोत अशी हिंट प्रेक्षकांना दिली होती. त्यामुळे श्रेया आणि गौरव मोरेची जोडी प्रेक्षकांना ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकताना दिसणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

‘झी मराठी’च्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेमा म्हणाल्या, “सदैव तुमची, झी मराठी… हे वाक्यच आपल्या नात्यांमधील भावनिक गुंतवणूक दाखवतं. एकमेकांच्या सुख-दुःखात उभं राहणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरांतली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांबरोबरचं नातं आणखी दृढ करण्यासाठी ‘झी मराठी’ एका नवीन रूपात, नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे. या प्रवासात नव्याने सुरु झालेली ‘देवमाणूस’ आणि लवकरच सुरु होणारी ‘कमळी’ मालिका प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. याशिवाय पुन्हा नव्याने सुरु होणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. असे अनेक नवनवीन सरप्राइझेस येत्या वर्षांत आमच्याकडून तुम्हाला मिळतील.”

दरम्यान, नव्याने सुरू होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये नव्या कोणत्या कलाकरांची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय ‘कमळी’ मालिकेत हिरो म्हणून मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दलही सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे.