“हसताय ना…हसायलाच पाहिजे”, असं म्हणत घराघरात पोहोचलेले लोकप्रिय निवेदक, अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे यांनी ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ मधून काही महिन्यांपूर्वी एक्झिट घेतली. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेली १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या हा कार्यक्रम बंद होणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. अखेर काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ऑफ एअर झाला. पण आता निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजनेसह महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्या कार्यक्रमातून विनोदाचे हे तीन हुकमी एक्के प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा नवा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या विनोदी कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा म्हणजेच कॅप्टन ऑफ द शीप असणार आहेत निलेश साबळे.

हेही वाचा – “व्हिलचेअरवर ऑक्सिजनचा पाइप लावून विजय चव्हाणांना बसलेलं पाहून धर्मेंद्र यांनी…”, वरद चव्हाणने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला…

‘कलर्स मराठी’च्या या नव्या विनोदी कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने यांच्या व्यतिरिक्त स्नेहल शिदम, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण हे कलाकार असणार आहेत. तसेच या कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टी व नाट्यसृष्टीमध्ये अत्यंत अदबीने नाव घेतलं जातं, विनोदाचे बादशहा भरत जाधव व अलका कुबल-आठल्ये दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”

निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा नवा विनोदी कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Color marathi new comedy show hastay na hasayla pahije of nilesh nilesh sabale bhau kadam onkar bhojane coming soon pps