Colors Marathi New show: विविध वाहिन्यांवर विविध टीव्ही शो, विविध कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतात. नवीन मालिका, रिअॅलिटी शो यांमुळे वाहिनीच्या टीआरपीवरदेखील फरक पडतो.

प्रदर्शित होत असलेले कार्यक्रम जर लोकप्रिय ठरले, तर त्याला टीआरपी चांगला मिळतो. त्यामुळे वाहिन्या टीआरपीनुसार अनेक बदल करीत असतात. काही मालिका बंद केल्या जातात, तर काही नवीन मालिका प्रदर्शित होतात.

आता कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात अलका कुबल, निवेदिता सराफ, सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीपा परब, क्रांती रेडकर अशा लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहेत.

कलर्स मराठीवर नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला

कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला दीपा परब म्हणते, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे बाई असते आणि यशस्वी बाईमागे?”, पुढे अलका कुबल म्हणतात, “बाईच्या डोक्यावर पदर हवाच; पण तेवढा आदर तरी देताय का? याचाही विचार हवाच ना?”, क्रांती रेडकर म्हणते, “बाईने मात्र ७ च्या आत घरात आलं पाहिजे; पण ते येतात का कधी ७ च्या आत घरात?”

प्रोमोमध्ये पुढे प्रार्थना बेहेरे दिसते. ती म्हणते, “गळ्यात मंगळसूत्र म्हणजे लग्नाचं प्रतीक. पण, पुरुषांच्या गळ्यात काहीच नसतं.” निवेदिता सराफ म्हणतात, “घरातल्या सगळ्यांचं सगळं कोण करतं? बाई…”, अलका कुबल म्हणतात, “बाई लग्न करून दुसऱ्यांच्या घरात येते, त्यांना आपलंसं करते.” सुकन्या मोने म्हणतात, “ती गाडी चालवते, ट्रेन चालवते. अगदी विमानसुद्धा चालवते”, अदिती सारंगधर म्हणते, “आठवड्यातला एक दिवस तरी घरच्या बाईला सुट्टी द्यायलाच हवी”, प्रार्थना म्हणते, “नावापुढे लावायला वडिलांचं नाव; पण ठेच लागली की, आपण आई गं, असंच म्हणतो ना?”

बाईपण जिंदाबाद, असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, एक बाई आपल्या घराला तिचं संपूर्ण जग बनवते; पण त्याच घरात ती स्वतःचं जग हरवून बसते. ‘बाईपणा’चा खरा अर्थ सांगायला, महानायिका येत आहेत हृदयस्पर्शी कथांसह आपल्या भेटीला”, अशी कॅप्शन दिली आहे.

२६ ऑक्टोबर २०२५ पासून दर रविवारी रात्री ८ वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.

आता हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या कार्यक्रमात नेमके काय पाहायला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, अलका कुबल ते प्रार्थना बेहेरे अशा सर्व नायिकांना एकत्र, एकाच कार्यक्रमात पाहायला मिळणार असल्याने ती प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे. आता या कार्यक्रमात आणखी काही नवे चेहरे असणार का, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे आहे.

दरम्यान, कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा ग पोरी पिंगा, इंद्रायणी, अशोक मा. मा. या मालिकांनादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. आता बाईपण जिंदाबाद या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.