Devdatta Nage : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश आणि जगभरातून या मालिकेला प्रेक्षक पसंती मिळाली. जिथे जिथे मराठी प्रेक्षकवर्ग आणि खंडोबांचे भक्तगण आहेत तिथे तिथे ही मालिका पोहोचली. मालिकेबरोबरच यातील कलाकारांना म्हणजेच मल्हार देवाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे, म्हाळसाबाईंच्या भूमिकेतील सुरभी हांडे आणि बानूबाईंच्या भूमिकेतील ईशा केसकर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली.

“भय्याराव आवडला आणि मी फेमस व्हायला लागलो”

मात्र तुम्हाला माहित आहे का? ‘जय मल्हार’ मालिकेसाठी आणि त्यातील भूमिकेसाठी अभिनेते देवदत्त नागेने आधी नकार दिला होता. याबद्दल स्वत: देवदत्त नागेने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. देवदत्त नागेने अमोल परचुरे यांच्या ‘कॅचअप’शी संवाद साधला. या संवादात त्याने आधी ‘जय मल्हार’ या मालिकेसाठी नकार दिल्याचे सांगितलं आहे. याबद्दल तो म्हणाला की, “‘देवयानी’ मालिकेतला भय्याराव लोकांना आवडायला लागला आणि मी हळूहळू लोकप्रिय व्हायला लागलो.”

“मी ‘जय मल्हार’ मालिका आधी घेतच नव्हतो पण…”

यानंतर त्याने असं म्हटलं की, “तेव्हा ही भावना निर्माण झाली की, आपण जे काही करत ते माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. मी प्रेक्षकांना कधीच प्रेक्षक म्हणत नाही. म्हणजे ते मायबाप रसिक आहेतच; पण ते कुटुंबासारखेही आहेत. तर ‘देवयानी’ मालिका करत असताना मला ‘जय मल्हार’साठी विचारण्यात आलं. मी ‘जय मल्हार’ मालिका आधी घेतच नव्हतो. मग मला मनोज कोल्हटकर यांनी फोन केला आणि सांगितलं की, महेश कोठारे एक प्रोजेक्ट करत आहेत. पौराणिक प्रोजेक्ट आहे. पण खंडोबा की ज्योतिबा? कुणावर करत आहेत हे माहीत नाही. पण मला वाटतं, तू तिथे चांगला दिसशील. तर तू जाऊन भेटून ये.”

“महेश कोठारेंना नाही जमणार सांगायला गेलो आणि…”

यापुढे देवदत्त नागे म्हणाला की, “तेव्हा माझं असं झालं की, ‘देवयानी’ मालिका चांगली सुरू आहे ना? कशाला वगैरे… मग त्यांनीच माझे सगळे फोटो तिकडे पाठवले. तिकडून मला फोन यायचे; पण मी उचलत नव्हतो. मग म्हटलं त्यांच्यासाठी आणि महेश सरांना समोरून नाही म्हणण्यासाठी जाऊ. कारण महेश सर इतकी मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांना समोर जाऊन मला नाही म्हणणार हे सांगायचं होतं. पण त्यांनी मला त्या कपड्यात अडकवलं आणि मग ‘जय मल्हार’ हिट झाली. तेव्हा ही अपेक्षा नव्हती की, ‘जय मल्हार’ हिट होईल.”

खंडोबा आणि बजरंग अशा भूमिकांमुळे देवदत्त नागे लोकप्रिय

दरम्यान, खंडोबा, महादेव, बजरंग अशा पौराणिक भूमिकांमुळे लोकप्रिय झालेला देवदत्त नागे बॉलीवूडमध्येही तितकाच गाजला. त्याने अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्येही मुख्य भूमिका केल्या. याशिवाय त्याने ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. काही दिवसांपुर्वी तो स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवर ‘उदे गं अंबे’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. मात्र या मालिकेने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे.