Kiran Gaikwad Talk About Negative Role : टेलिव्हिजनवरील अशा फार कमी मालिका आहेत, ज्या अनेक वर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यापैकीच एक म्हणजे ‘देवमाणूस’. ‘देवमाणूस’ ही मालिका आजवरच्या काही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘देवमाणूस’ आणि ‘देवमाणूस २’ या दोन्ही मालिकांनी प्रेक्षकांची मन जिंकली. त्यानंतर या मालिकेचं तिसरं पर्व ‘देवमाणूस – मधला अध्याय’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

अभिनेता किरण गायकवाड हा ‘देवमाणूस – मधला अध्याय’ मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतील त्याचं अजित कुमार हे पात्र नकारात्मक असलं, तरी प्रेक्षकांनी या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद दिला. हीच नकारात्मक भूमिका करण्याबद्दल किरणने एका मुलाखतीत प्रतिक्रिया व्यक्त केली.

झी मराठी पुरस्कार २०२५ चा नामांकन सोहळा नुकताच पार पडला. यानिमित्ताने किरणला झी मराठीवरील ‘देवमाणूस’मधील भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. याबाबत किरण म्हणाला, “२०१७ पासून मी झी मराठी वाहिनीवरच काम करत आहे. देवाच्या आशीर्वादाने आणि सातत्याने मला ते काम बरं जमत आहे. त्यामुळे मी नकारात्मकच भूमिका करत आहे. किंवा ते माझ्या नशिबातच आहे की काय? असं वाटतं.”

किरण गायकवाड इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे किरण म्हणतो, “‘देवमाणूस’चा दूसरा भाग संपल्यावर मला झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या मंचावरच श्वेता शिंदे यांनी ‘देवमाणूस ३’ या मालिकेबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना असं म्हटलेलं की, ‘देवमाणूस २’च्या शेवटी तर अजितकुमारला फाशी झाली होती. मग आता हे पुन्हा कसं होऊ शकतं? पण यातच गंमत आहे. लेखकाच्या कल्पक दृष्टीतून ते पात्र पुन्हा जिवंत झालं.”

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत किरणने पुरस्कार सोहळ्यांबद्दलही त्याचं मत व्यक्त केलं. याबद्दल किरण म्हणाला, “मला असं वाटतं पुरस्कार वगैरे ठीक आहेत. पण ज्याच्याकडे काम आहे, तोच खरा पुरस्कार आहे. ती ट्रॉफी आहे, ती कलाकारांच्या कामाच्या कौतुकासाठी आणि त्यातून तुम्हाला पुन्हा नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळण्यासाठी हवी असते.”