Kiran Gaikwad : ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार जिंकल्यावर त्याला मंचावर एक खास सरप्राइज मिळालं. ते काय आहे पाहुयात…
किरण गायकवाड म्हणाला, “२०१७ पासून मी खलनायकाची भूमिका साकारतोय. त्यानंतर वाट्याला देवमाणूस मालिका आली. आता देवमाणूसचा हा तिसरा सीझन आहे आणि दरवर्षी मला हा पुरस्कार मिळाला आहे. आमच्या टीमला सुद्धा या पुरस्काराबद्दल खात्री होती. पण, एक गोष्ट आवर्जून सांगेन, ज्या खलनायकांना नामांकन मिळालं होतं ते सगळेच खूप ताकदीचे होते. थँक्यू सो मच. भावांनो हा सन्मान आपल्या सर्वांचा आहे.”
“घरी गेल्यावर आईची प्रतिक्रिया काय असेल?” असा प्रश्न त्याला अभिनेता अभिजीत खांडकेकर विचारतो आणि यानंतर किरणच्या मागे व्हिडीओ सुरू करण्यात आला. याद्वारे किरणच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“माझं पूर्ण नाव शकुंतला बाबुराव गायकवाड. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही इमारतीचं काम करायला जायचो. पाणी वगैरे मारायचं असं काम करायचो. त्यामुळे आमची परिस्थिती आधीपासून बेताची होती. आम्हा दोघांना मिळून या कामाचे २० रुपये मिळायचे. किरणचा जन्म होणार होता तेव्हापासून माझी परिस्थिती हळुहळू बदलत गेली. मी आधीच ठरवलं होतं, की मुलगी झाली तरी किरण नाव ठेवणार आणि मुलगा झाला तरी किरणच नाव ठेवणार. किरणने कामाला लागल्यावर पहिल्या पगारातून मला साडी घेतली होती, मला इतकं भारी वाटत होतं. अजूनही ती साडी माझ्याकडे आहे.”
किरणच्या आई पुढे म्हणाल्या, “पूर्वी आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. पण, किरणने हक्काच्या घराची माझी इच्छा पूर्ण केली. किरणने माझ्यासाठी हे मोठं घर घेतलंय…ते मला अवॉर्ड्स ठेवून सजवायचं आहे. किरण म्हणजे माझं आयुष्य आहे…आणि किरणशिवाय कधीच मला काही दिसलं नाही. सगळीकडे माझा किरण…मी आई म्हणून त्याच्या पाठिशी उभी आहे आणि कायम राहणार…हे आनंदाचे क्षण पाहायला त्याचे वडील आणि आजी असायला पाहिजे होते.”
“मला नेहमी खलनायकाचा पुरस्कार मिळतो…पण आज मला सर्वोत्कृष्ट मुलाचा पुरस्कार जिंकल्यासारखं वाटतंय. आई ही ट्रॉफी तुझी आहे.” असं म्हणत किरणने स्वत:चा पुरस्कार आईकडे सुपूर्द केला.