Bigg Boss Marathi Fame Dhananjay Powar : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार त्याच्या कौटुंबिक Vlogs मुळे सर्वत्र लोकप्रिय झाला. कोल्हापुरचा धनंजय हळुहळू घराघरांत ‘डीपी दादा’ म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतर त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश केला आणि त्याची लोकप्रियता तुफान वाढली. शो संपला असला तरीही, डीपीने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. धनंजय नेहमीच सामाजिक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली स्पष्ट मतं मांडताना दिसतो.
गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी नकारात्मक प्रसिद्धी मिळवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अश्लील भाषेचा वापर, अश्लील फोटो शेअर करून प्रसिद्ध होणं याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशाप्रकारची वाईट प्रसिद्ध मिळवून मोठं होणं, पैसा कमावणं हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे लहान मुलांवर देखील गंभीर परिणाम होत असल्याचं धनंजयने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
डीपी दादा म्हणतो, “नमस्कार! आज आपण चर्चा करणार आहोत की, सोशल मीडियावर नेमकं काय चाललंय? सगळ्या गोष्टींची राखरांगोळी होणार आहे. आज प्रत्येकाला सोशल मीडियावर व्हायरल व्हायचंय, स्वत:चे फॉलोअर्स वाढवायचे आहेत आणि यासाठी काहीजण विचित्र नग्न फोटो, अश्लील कंटेट शेअर करतात. सुरुवातीला असं काहीतरी करून व्हायरल व्हायचं आणि त्यानंतर सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी करून तुम्ही सगळं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करता. ही सगळी एक स्ट्रॅटेजी झालीये.”
धनंजय पुढे म्हणाला, “आता माझा या सगळ्यावर रोष का आहे हे सुद्धा सांगतो, कारण येत्या पिढीला आपण सावरायला पाहिजे. एक पालक म्हणून आपली जबाबदारी असते. थोडंतरी आपल्या मुलांकडे लक्ष द्या, आपण सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. आज नेपाळसारख्या देशाने जेव्हा सोशल मीडिया बॅन करायचा निर्णय घेतला तेव्हा तिथे वेगळाच प्रकार घडला. नग्न फोटो, बोल्ड फोटो शेअर केले जातात आणि आपल्या मुलांनी हे सगळं बघायचं का? या सगळ्या गोष्टी अल्गोरिदममध्ये येत आहेत. कारण, इन्स्टाग्रामला सध्या कंटेट बनवणारे लोक हवेत, तेवढ्या जाहिराती त्यांना मिळत आहेत. सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठीही करता येतो फक्त आपल्याला तेवढी समज असली हवी. पण, घराघरातंल्या मुलांना आता आई-वडिलांची नव्हे तर फक्त मोबाईलची संगत हवी असते.”
“सोशल मीडियावर सतत गेमिंगच्या, जुगाराच्या जाहिराती दाखवल्या जातात. पण, आज किती लोकांच्या घराची राख होतेय याची जाणीव कोणालाच नाहीये. येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश देतोय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.”
“खूप-खूप वाईट वाटतं…तुम्हाला वाईट पद्धतीनेच का मोठं व्हायचं आहे? सोशल मीडियावर अश्लील दर्शन आणि अश्लील भाषेचा वापर करणं सुरूये. काय देणार आहोत आपण येणाऱ्या पिढीला? पैसा कमवायचाय म्हणून काहीही कराल? इतरांचा चांगला विचार नको का करायला? हे लोक येणाऱ्या पिढीला भिकेला लावतील. पुढच्या पिढीने भीक मागायला तयार राहा.” अशा इशारा धनंजयने पोस्ट शेअर करत दिला आहे.