Dhananjay Powar New Business : धनंजय पोवार म्हणजेच कोल्हापूरकरांचा लाडका डीपी दादा. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झालं. धनंजयला प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सर्वत्र ओळखलं जातं. त्याचे कौटुंबिक व मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. डीपी दादा उद्योजक म्हणून देखील प्रचलित आहे. त्याच्या सोसायची फर्निचर या दुकानाची सुद्धा नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते.

आता धनंजयने आणखी एका नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला आहे. काही दिवसांपूर्वी डीपीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ‘डीडी दादा डॉट कॉम’ या अंतर्गत चष्मा-गॉगल विक्रीचा नवीन व्यवसाय सुरू केल्याचं सांगितलं होतं. आता याच्या पहिल्या शाखेचं १९ ऑगस्ट रोजी ‘अकलूज’ येथे उद्घाटन करण्यात आलं आहे.

डीपी दादाने त्याच्या पहिल्या गॉगल स्टोअरच्या उद्घाटनासाठी अकलूज याठिकाणी ग्रँड सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील अनेक सेलिब्रिटी स्पर्धक धनंजयला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण, वैभव चव्हाण, पुरुषोत्तम दादा पाटील, घन:श्याम दरवडे ( छोटा पुढारी ), जान्हवी किल्लेकर या सगळ्यांनी डीपी दादाच्या पहिल्या स्टोअरला भेट देत त्याचं भरभरून कौतुक केलं. यांच्यासह काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

धनंजयच्या नव्या दुकानाच्या उद्घाटन समारंभाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह चाहत्यांनी डीपीवर कौतुकाचा वर्षाव करत त्याला या नव्या व्यवसायासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. “अशीच प्रगती करा दादा”, “अभिनंदन Dp दादा अशाच संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या Branch होवोत”, “अभिनंदन दादा”, “दादा हीच खरी सुरुवात आहे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, धनंजय पोवारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यापर्यंत तो पोहोचला होता. टॉप ५ मधून त्याला एलिमिनेट करण्यात आलं होतं. या शोमुळे डीपी घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर डीपी दादा ‘स्टार प्रवाह’च्या ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात झळकला.