‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून नावाजलेली अंकिता वालावलकर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. १६ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली. अंकिता व कुणालच्या लग्नसोहळ्याला सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरसह कलाकार आणि राजकारणातील मंडळींनी खास उपस्थिती लावली होती. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण, या लग्नसोहळ्याला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील बरेच जण अनुपस्थित होते. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे अंकिताच्या लग्नात दिसले नाहीत. त्यामुळे अंकिताने यांना निमंत्रण दिलं की नाही? हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. पण, आता निक्कीने याबाबत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वानंतर निक्की तांबोळी सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात ती विविध पदार्थ बनवून परीक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. निक्कीने नुकतीच एका वृत्तसंस्थेच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी ती अंकिता वालावलकराच्या लग्नाबद्दल बोलली आणि तिला शुभेच्छा दिल्या.

निक्कीला विचारलं की, अंकिताने लग्नाला निमंत्रण दिलं होतं की नाही? यावर निक्की म्हणाली, “तिने सुरुवातीला मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण, मी माझ्या कामात इतकी व्यग्र होती की मला जमलंच नाही. परंतु, तिला माझ्या शुभेच्छा.”

पुढे निक्कीला आवडी-निवडी विचारण्यात आल्या. तिला सुरुवातीला विचारलं की, आवडता पदार्थ? तर निक्की म्हणाली, “सध्या मी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ करतेय. त्यामुळे खूप सारे आवडते पदार्थ आहेत. पण, करंजी मला खूप आवडते.” त्यानंतर आवडता अभिनेता आणि अभिनेत्री विचारलं. यावेळी निक्कीने रितेश देशमुखचं नाव घेतलं. तसंच निक्कीला ‘कल हो ना हो’ चित्रपट खूप आवडतो. याशिवाय तिचा स्वयंपाक करणं हा आवडता छंद असल्याचं तिने सांगितलं.

दरम्यान, अंकिता वालावलकरच्या लग्नसोहळ्याला १३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. मेहंदी, साखरपुडा, संगीत, हळद आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा अंकिताचा पाहायला मिळाला. लग्नासाठी अंकिताने खास पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. तसंच अंकिताचा पती कुणालने मराठमोळा लूक केला होता. अत्यंत पारंपरिक पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला. अंकिता व कुणालच्या लग्नाला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले यांनी खास हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did ankita walawalkar invite nikki tamboli for marriage pps