Bigg Boss 19 Updates: ‘बिग बॉस 19’ ची सुरुवात झाली आहे. पहिल्याच आठवड्यात बसीर अली व कुनिका सदानंद यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्याचबरोबर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ जिंकणाऱ्या गौरव खन्नाचीही घरात चर्चा पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरात मृदुल तिवारीने गौरव खन्नाला काही खासगी प्रश्न विचारले. त्याची गौरवने दिलेली उत्तरं चर्चेत आहेत.
मृदुलने गार्डन एरियामध्ये गौरवला त्याचं लग्न व मुलांबद्दल विचारलं. ‘तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली आहेत?’ असं मृदुलने गौरवला विचारलं. त्यावर ‘नोव्हेंबरमध्ये ९ वर्षे होतील,’ असं गौरव म्हणाला. ‘तुम्हाला मुलं आहेत का?’ असं मृदुलने गौरवला विचारलं.
गौरव म्हणाला, “नाही! माझ्या पत्नीला (आकांक्षा चमोला) मुलं नको आहेत.” हे ऐकून मृदुल स्तब्ध झाला. त्याने गौरवला विचारलं, ‘आणि तुम्हाला?’ यावर गौरव मृदुलला समजावत म्हणतो, “मला पाहिजे. पण आमचं लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे ती जे म्हणेल ते ऐकावं लागेल. प्रेम केलंय तर साथ द्यावी लागेल ना.” हे ऐकून मृदुल इम्प्रेस झाला. “वाह! पण असं का?” असं मृदुल म्हणाला.
आंकाक्षाला बाळ का नकोय?
गौरवने मृदुलला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्याची बायको बाळ नकोय असं का म्हणते, याबद्दल गौरव म्हणाला, “तिचा विचारही बरोबर आहे. कारण मूल सांभाळणं ही मोठी जबाबदारी असते. आता ती व मी सोबत राहतो. मी कामावर जातो, तिलाही काम मिळालं की मग आम्हाला बाळ दुसऱ्या कुणाजवळ ठेवायचं नाही.” त्यावर मृदुल म्हणतो, “यापेक्षा बाळाला जन्म न देणंच योग्य.” यावर गौरवने होकार दिला.
मृदुल पुढे म्हणाला, “तर तुम्ही विचार केला की आपण आपले आयुष्य स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवायचे. आपण आपल्या आयुष्यात कोणतीही नवीन जबाबदारी नको.’ गौरव पुन्हा म्हणाला, “हो! मला बाळ हवे होते, पण जेव्हा तिने मला या गोष्टी समजावून सांगितल्या तेव्हा मी म्हणालो, ठीक आहे.” मृदुल म्हणाला, ‘दोन-चार वर्षांनी बघा.’ यावर गौरव म्हणाला, “हो! कधीही नाही म्हणू नये.”
आकांक्षा बाळाबद्दल काय म्हणते?
रुचिता शर्माशी बोलताना आकांक्षाने एकदा म्हटलं होतं की तिला बरेचदा बाळाबद्दल विचारलं जातं. पण आपण गौरव या मोठ्या बाळाची काळजी घेत असल्याचं ती गमतीत म्हणाली होती. तसेच गौरवला मुलं हवी आहेत, पण आकांक्षा अद्याप बाळासाठी तयार नाही. पती व सासू-सासऱ्यांनी कधीच बाळासाठी दबाव आणला नाही, असं म्हणत आकांक्षाने कौतुक केलं होतं.