Chala Hawa Yeu Dya Gaurav More Promo : ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये दर आठवड्यात नवीन पाहुणे सहभागी होतात. दोन आठवड्यांपूर्वी यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सहभागी झाल्या होत्या. यावेळी कलाकारांनी त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांचं औक्षण करून सर्व कलाकारांनी एकत्र सेलिब्रेशन केलं होतं. याशिवाय गेल्या आठवड्यात या शोमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित होते. त्यांचाही शोमधील कलाकारांकडून विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय त्यांच्या गाजलेल्या भूमिकांचं स्किट देखील सादर करण्यात आलं होतं.
आता येत्या आठवड्यात शोमध्ये कोण सहभागी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘झी मराठी’ने या आठवड्याचा प्रोमो शेअर करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. कारण, ‘चला हवा येऊ द्या’च्या आगामी भागात कोणतेही सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येणार नाहीयेत. तर, शोमध्ये गँग लीडर्सची भूमिका बजावणाऱ्या कलाकारांचे कुटुंबीय या आठवड्यात शोमध्ये एन्ट्री घेणार आहेत.
लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे ‘चला हवा येऊ द्या’च्या या नव्या पर्वात गँग लीडर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्याची आई सुद्धा लाडक्या लेकाचा शो पाहण्यासाठी प्रत्यक्ष सेटवर उपस्थित होती. यावेळी गौरवच्या आईने त्याच्याविषयीची अनेक गुपितं प्रेक्षकांना सांगितली.
आईला पाहताच गौरव मोरे म्हणतो, “आज लय सोनं घालून आली तू” यावर सगळेजण या मायलेकाचं हटके बॉण्डिंग पाहून हसु लागतात. शोचा सूत्रसंचालक अभिजीत खांडकेकर गौरवच्या आईला विचारतो, “गौरवने तुमचा कधी मार खाल्ला आहे का?” यावर अभिनेत्याची आई म्हणते, “अरे आतापर्यंत मी त्याला मारते…” अभिजीतचा प्रश्न ऐकताच गौरवची आई थेट कृती करून दाखवते. त्या रंगमंचावरच गौरवला केस पकडून बदडतात. यानंतर मंचावर एकच हशा पिकतो.
गौरवच्या आईप्रमाणे या आठवड्यात शोमध्ये भारत गणेशपुरेची पत्नी, प्रियदर्शन जाधवची पत्नी, श्रेया बुगडेची आई, कुशल बद्रिकेची पत्नी सुनयना, अभिजीत खांडकेकरची बायको सुखदा हे सगळेजण सहभागी होतील.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा हा विशेष भाग १२ आणि १३ सप्टेंबरला रात्री ९:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.