Abhishek Rahalkar & Krutika Kulkarni Lovestory : अभिषेक रहाळकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेतून मुख्य नायकाच्या भूमिकेतून दिसत आहे. यातील त्याची व अभिनेत्री समृद्धी केळकरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच आता त्याने त्याच्या खऱ्या आयुष्यातील बायकोबद्दल आणि प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

अभिषेक रहाळकर लग्नापूर्वी त्याची बायको तेव्हाची गर्लफ्रेंड कृतिकाबरोबर दहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. प्रेमविवाह असल्याने दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. अभिषेकने सहपत्नीक ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे. अभिषेकने यावेळी तो त्याच्या बायकोला म्हणजेच कृतिकाला लग्नापूर्वी पत्र लिहायचा असं म्हटलं आहे.

अभिषेक रहाळकर लिहायचा पत्र

मुलाखतीत अभिषेकने दोघेही नाशिकचे असून दोघे नाशिकमध्येच भेटले होते असं म्हटलं आहे. अभिषेक याबद्दल म्हणाला, “सुरुवातीला माझ्याकडे फार पैसे नव्हते, तेव्हा मी तिला कविता लिहून पाठवायचो. आम्ही खूप पत्र लिहायचो. आम्ही दोघांनी एकमेकांसाठी पत्र लिहिली आहेत. ती नंतर पुण्याला गेलेली आणि मी मुंबईत आलो होतो, म्हणून मग आम्ही पत्र लिहायचो आणि कधीकधी भेटायचो; तेव्हा मी तिला भेटल्यानंतर पत्र द्यायचो.”

अभिषेकने त्याची गर्लफ्रेंड कृतिका कुलकर्णीबरोबर जानेवारी २०२५ मध्ये लग्न केलं. अभिषेकने सोशल मीडियावर थेट लग्नाचे फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली होती, त्यावेळी या जोडीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक मुळचा रंगभूमीवरचा कलाकार असून नाशिकमध्ये त्याने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्याने ‘स्वामिनी’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘तू तेव्हा तशी’ या मालिकांमध्ये काम केलं होतं.

दरम्यान, अभिषेक सध्या स्टार प्रवाहवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत दुष्यंत ही मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. यातील त्याच्या भूमिकेलाही त्याच्या आधीच्या भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.