Hruta Durgule Talks About Break up : हृता दुर्गुळे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या ‘आरपार’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये तिच्यासह अभिनेता ललित प्रभाकर झळकणार आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील पहिले प्रेम आणि ब्रेकअपबद्दल सांगितले आहे.
‘आरपार’ चित्रपट शुक्रवारी (१२ सप्टेंबर) प्रदर्शित होणार आहे. त्यामधून हृता दुर्गुळे व ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांनी नुकतीच ‘जस्ट नील थिंग्स’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये दोघांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाबद्दल तसेच ब्रेकअपबद्दल विचारण्यात आले.
हृता दुर्गुळेची पहिल्या प्रेमाबद्दल प्रतिक्रिया
आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात कधी पडलीस, असे विचारल्यानंतर हृता म्हणाली, “मी आठवीत होते. मला आता त्याबद्दल खूप काही आठवत नाही; पण मला आठवतंय की, त्यानंच मला विचारलेलं. मी आईच्या फोनवरून त्याच्याशी बोलायचे आणि अनेकदा माझ्या आईनं मला पकडलेलं. कारण माझ्या लक्षात नाही आलं की, हे आईला कळणारच आहे.”
हृता याबद्दल पुढे म्हणाली, “फक्त दोन-तीन महिने सुरू होतं. मी तुझा बॉयफ्रेंड तू माझी गर्लफ्रेंड असं वगैरे. त्यामुळे पहिलं प्रेम तेच होतं. पण तेव्हा प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे ही माहित नव्हतं. तो माझ्या शाळेतला नव्हता पण मित्रांच्या मार्फत आम्ही भेटलेलो.”
ब्रेकअपनंतर खूप त्रास झाला – हृता दुर्गुळे
अभिनेत्रीने पुढे तिच्या आयुष्यातील ब्रेकअपबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे तिला खूप त्रास झालेला. मुलाखतीत ललित व हृताला त्यांच्या ब्रेकअप स्टोरीबद्दल विचारल्यानंतर हृता कॉलेजमध्ये असताना झालेल्या ब्रेकअपबद्दल म्हणाली, “माझी ब्रेकअप स्टोरी आहे. पण मला असं वाटलं की, बरंच झालं ब्रेकअप झालं. मला खोटं बोलता येत नाही. माझी आई कायम मला पकडते. कॉलेजमध्ये असताना तिनं अनेकदा मला पाहिलं आहे; पण एकदा मला खूपच त्रास झालेला. तेव्हा मी आईला म्हटलेलं की, मला एकदा त्याला भेटायचं आहे. आई-वडिलांना त्याबद्दल कळल्यानंतर ते म्हणालेले की, नाही हे होणार नाही वगैरे. स्वत: आधी करिअर करा. आयुष्यात पैसे कमवायची अक्कल नाही आणि प्रेम करत सुटलेत वगैरे.”
दरम्यान, हृता दुर्गुळेबद्दल बोलायचे झाले तर, तिने प्रतीक शाहबरोबर २०२२ मध्ये लग्न केले होते. तिचा नवरा हिंदी मालिकांचे दिग्दर्शन करतो. नुकतीच या जोडीने नवी कोरी आलिशान गाडीसुद्धा खरेदी केली आहे. अनेकदा दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करीत असतात.