Pawandeep Rajan Health Update: लहान वयात आपल्या आवाजाने लाखो श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा, ‘इंडियन आयडल १२’चा विजेता पवनदीप राजनचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी सकाळी पवनदीपच्या पायाचं मोठं ऑपरेशन करण्यात आलं. अजूनही त्याच्यावर अनेक ऑपरेशन होणार आहेत. अशातच पवनदीप राजनच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट त्याच्या टीमकडून देण्यात आली आहे.
पवनदीप राजनच्या ( Pawandeep Rajan ) टीमने सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सांगितलं की, ५ मेला सकाळी पवनदीप राजनचा उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जवळ भीषण अपघात झाला; ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तो एका कार्यक्रमानिमित्ताने अहमदाबादला जाणारं विमान पकडण्यासाठी दिल्लीला जात होता. या भीषण अपघातानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण, गंभीर परिस्थिती असल्यामुळे पवनदीपला दिल्लीच्या एनसीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.
पवनदीपला ( Pawandeep Rajan ) शरीरावर बऱ्याच ठिकाणी मोठ्या दुखापती झाल्या आहेत. त्याच्या टीमने पुढे सांगितलं की, कालची रात्र त्याच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी खूप कठीण आणि दुःखद होती. तो पूर्ण दिवस वेदना सहन करत होता. त्याला शुद्ध नव्हती. ६ मेला संध्याकाळी ७ वाजता पवनदीपला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले होते. त्यानंतर जवळपास ६ तास पवनचं ऑपरेशन करण्यात आलं, जे यशस्वीरित्या पूर्ण झालं. सध्या तो आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, ३ ते ४ दिवस त्याने आराम केल्यानंतर बाकीचं फ्रॅक्चर व इतर दुखापतीवर उपचार सुरू करणार आहे. त्याचं दुसरं ऑपरेशन करणं गरजेचं आहे.
पवनदीप राजनच्या ( Pawandeep Rajan ) टीमने त्याच्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. “जगभरातील सर्व चाहत्यांनी, कुटुंबाने, मित्रांनी प्रार्थना केल्यामुळे आज त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे सगळ्यांचा मी आभारी आहे.” पवनदीपच्या टीमकडून आलेल्या या माहितीमुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे आणि लवकरच तो पूर्णपणे बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.