Jasmin Bhasin Casting Couch Experience: ‘दिल से दिल तक’ या मालिकेत काम करून अभिनेत्री जास्मिन भसीनला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने ‘बिग बॉस’ व ‘खतरों के खिलाड़ी’ हे रिअॅलिटी शो केले. जास्मिनने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने कास्टिंग काउचचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला.

जास्मिन अभिनयविश्वात नवीन होती, तेव्हा तिला आलेला एक अनुभव तिने शेअर केला. तसेच ऑडिशनच्या नावाखाली निर्माते, दिग्दर्शक कशी घाणेरडी कृत्ये करतात तेही जास्मिनने सांगितलं. जास्मिनला एका दिग्दर्शकाने हॉटेलच्या खोलीत बंद केलं होतं.

जास्मिन भसीनने नुकतीच ‘द हिमांशू मेहता शो’मध्ये हजेरी लावली. इथे तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिला आलेला एक भयंकर अनुभव सांगितला. “मी ऑडिशनसाठी मुंबईला आले होते. ती ऑडिशन जुहू येथील एका हॉटेलमध्ये होणार होती. तिथेच माझी मीटिंग ठरली होती,” असं जास्मिन म्हणाली.

“मी लॉबीमध्ये पाहिलं की मीटिंगसाठी आलेल्या बऱ्याच मुली वाट पाहत होत्या. नंतर माझी पाळी आली तेव्हा दारू प्यायलेल्या एका माणसाने मला ऑडिशनसाठी जाण्यास सांगितलं. तिथे आमचा को-ऑर्डिनेटर होता, तोही खोलीतून निघून गेला. त्यावेळी मला खूप भीती वाटली होती,” असं जास्मिनने सांगितलं.

खोलीत केलेलं बंद

पुढे जास्मिन म्हणाली, “त्या व्यक्तीने मला एक सीन दिला आणि तो करायला सांगितला. मी त्याला म्हणाले, ‘ठीक आहे सर, मी या सीनची तयारी करून उद्या येईन.’ मग त्याने लगेच नकार दिला आणि म्हणाला नाही-नाही तुला तो आताच करावा लागेल. त्या सीनमध्ये माझा प्रियकर मला सोडून जात असतो आणि मला त्याला थांबवायचं असतं. मग मी तो सीन केला.”

“तो दिग्दर्शक नंतर मला म्हणाला, नाही असं नाही, तुला तर… मग त्याने खोली बंद केली आणि काहीतरी विचित्र करण्याचा प्रयत्न केला. मग मी माझी ताकद वापरली आणि तिथून पळून गेले. यानंतर मी ठरवलं की मी कधीही अशा हॉटेल्समध्ये आणि खोल्यांमध्ये मीटिंग करायला जाणार नाही,” असा धक्कादायक प्रसंग जास्मिनने सांगितला.