मराठीतील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. या मालिकेने अडीच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. विशेष म्हणजे प्राजक्ता माळी व ललित प्रभाकरच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. याच मालिकेतील एका अभिनेत्याचं मोठ्या थाटामाटात लग्न झाल्याचं समोर आलं आहे.

‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील ‘आदित्य नगरकर’ म्हणजे अभिनेता कौस्तुभ दिवाण लग्नबंधनात अडकला आहे. किर्ती कदम हिच्याशी लग्न करून कौस्तुभने आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. या लग्नाला अभिनेता आस्ताद काळे, त्याची पत्नी स्वप्नाली पाटील, मेघा धाडे, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे, अभिजीत केळकर या मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या हे मराठी कलाकार सोशल मीडियावर कौस्तुभ व किर्तीच्या लग्नाचे फोटो शेअर करून दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा – लग्नानंतर एकाच घरात राहूनही प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर एकमेकांना भेटत नाहीत, असं का? जाणून घ्या…

लग्न विधीसाठी कौस्तुभ व किर्तीने मराठमोळा लूक केला होता. अभिनेत्याने ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि केशरी रंगाचं धोतर परिधान केलं होतं. तसंच कौस्तुभने या लूकवर पिवळ्या रंगाचा फेटा घातला होता. अभिनेत्याच्या बायकोने केशरी रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

लग्नाच्या रिसेप्शनला कौस्तुभ व किर्ती सुंदर लूकमध्ये दिसले. किर्तीने ब्राउन रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता. तर अभिनेत्याने बायकोला मॅचिंग करण्यासाठी ब्राउन रंगाची शेरवानी परिधान केली होती. किर्तीने तिच्या इन्स्टाग्रामवर रिसेप्शनमधील एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या महिन्यात १८ मार्चला आस्ताद, स्वप्नाली, मेघा, शाल्मली टोळ्ये, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे या सगळ्यांनी कौस्तुभ व किर्तीची केळवण केलं होतं. या केळवणाच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

हेही वाचा – Video: रणवीर सिंहपेक्षा जबरदस्त डान्स करतो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली, पाहा व्हिडीओ

कौस्तुभच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये झळकला आहे. ‘बंध रेशमाचे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे!’, ‘तुजं माजं सपान’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. कौस्तुभ हा अभिनयासह संवाद लेखन देखील करतो.