Kamli Serial New Promo : ‘कमळी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असतात. सध्या मालिकेत कमळी हृषीवर रागावलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून यामध्ये काही मुलं कमळीची छेड काढताना दिसत आहेत.

‘कमळी’ मालिकेत अनिका व तिच्या ग्रुपने कमळीला कॉलेजमधून काढण्यासाठी तिने अनिकाच्या चेहऱ्यावर केमिकल टाकल्याचा आरोप केला होता, परंतु कमळीने तो आरोप चुकीचा ठरवत स्वत:ला सिद्ध केलं. अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनिकाने पुन्हा एकदा कमळीला अडचणीत आणण्यासाठी एक प्लॅन बनवल्याचं पाहायला मिळतं.

‘झी मराठी’च्या सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये काही मुलांनी कमळीच्या भोवती गराडा घातल्याचं पाहायला मिळतं आणि ते तिला छेडताना दिसतात. त्यावेळी अनिका व तिच्या मैत्रिणी दरवाजा आडून हे सगळं पाहत असतात आणि कमळीला अडचणीत पाहून आनंदी होतात.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये कॉलेजमधील काही मुलं तिला त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यावेळी तिला एक मुलगा “हे तुझे नाजूक हात, ही तुझी नाजूक कंबर” असं म्हणत तिची छेड काढत असतो. हे सगळं ऐकून कमळी खूप घाबरलेली पाहायला मिळते. कमळीने हात झटकल्यानंतर तो मुलगा तिला “तूच तर आम्हाला इथे बोलवून घेतलंस ना” असं म्हणत त्याच्या मित्राला लॅपटॉप ऑन करायला सांगतो.

हृषी कमळीच्या मदतीसाठी वेळेत पोहोचणार

लॅपटॉमधील व्हिडीओमध्ये कमळी “माझ्या मैत्रिणीला वोट करा आणि एक किस मिळवा” असं म्हणताना दिसते. हे ऐकून कमळी घाबरते आणि “हे बंद करा” असं म्हणते. यानंतर ती सगळी मुलं कमळीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे पाहून अनिकाला खूप आनंद होत असतो आणि दरवाजा आडून ती हे सगळं बघत असते. तेवढ्यात तिथे हृषी येतो आणि त्या मुलांना धक्का देऊन खाली पाडतो.

कमळीला त्रास देण्यासाठी अनिकाने तंत्रज्ञानाच्या मदतीने हा व्हिडीओ बनवला का? कमळीला त्रास देण्यासाठी हा तिचा नवीन डाव आहे का? हे येत्या भागात पाहायला मिळेल. अनिकाची कॉलेजमधील हुकूमशाही संपवण्यासाठी कमळीची मैत्रीण अनिकाच्या विरुद्ध कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीच्या पदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेते. परंतु, यामुळे अनिकाचा राग अनावर झालेला असतो. त्यामुळे आता कमळी मालिकेत पुढे नेमकं काय घडणार? हृषी कमळीची त्या मुलांच्या तावडीतून कशी सुटका करणार आणि यामुळे कमळीचा त्याच्यावरचा राग जाईल का? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल.