Kapil Sharma Death Threats : लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चर्चेचं कारण म्हणजे कपिलच्या कॅफेवर झालेले गोळीबार. १० जुलै रोजी कपिलच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. तसंच यानंतर पुन्हा एकदा कॅफेवर गोळीबार झाला आणि याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली.
यानंतर कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. याप्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे कपिलला धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई क्राईम ब्रँचनं अटक केली आहे. कपिल शर्माला धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला मुंबई क्राईम ब्रँचनं पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, आरोपीचं नाव दिलीप चौधरी असं असून, त्याने कुख्यात गुंड रोहित गोडारा आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने कपिल शर्माला धमक्या दिल्या. तसेच त्याने काही धमकीचे व्हिडीओही कपिल शर्माला पाठवले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
२२ ते २३ सप्टेंबरदरम्यान कपिल शर्माला सात वेळा धमकीचे फोन आले. याशिवाय दुसऱ्या एका क्रमांकावरूनही त्याला धमकावण्यात आलं. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचनं तात्काळ तपास सुरू करून आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक केली. आता त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणलं जात आहे आणि ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू आहे की, आरोपीचे खरोखर या गुंडांशी काही संबंध आहेत का? की केवळ त्यांच्या नावाचा गैरवापर करून तो खंडणी मागत होता.
कपिल शर्मा इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या भागात सलमान सहभागी झाला होता. यानंतर कपिलला धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगमधील एका सदस्याकडून सोशल मीडियावर याबद्दलची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात “सलमान खानबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाचं असंच होईल”, अशी धमकी देण्यात आली होती.
सतत मिळणाऱ्या धमक्या आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कपिल शर्माची सुरक्षादेखील वाढवली होती. अशातच कपिलला येणाऱ्या धमकी प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, कपिल सध्या त्याच्या नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.