Sunil Grover Was Hospitalised For Depression : टीव्हीवरील लोकप्रिय ‘कपिल शर्मा शो’मधून अनेक विनोदी कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सुनील ग्रोवर. सुनीलनं आजवर त्याच्या अनेक विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. पण, त्याच्या या हसऱ्या स्वभावामागे डिप्रेशनचं कारण आहे. कपिल शर्मा शो आधी अभिनेता अनेक मानसिक समस्यांचा सामना करत होता, याबद्दल त्याच्या सहकलाकारानं खुलासा केला आहे.

सुनील ग्रोवर, जो ‘कपिल शर्मा शो’मधून घराघरात ओळखला जातो. कपिल शर्माच्या शोमध्ये २०१३ मध्ये त्याला मोठा ब्रेक मिळण्याआधी सुनील मानसिक समस्यांचा सामना करत होता, याबद्दल त्याची सहकलाकार उपासना सिंगने खुलासा केला आहे.

NDTV च्या वृत्तानुसार याबद्दल उपासना म्हणाली, “कपिलचा शो सुरू झाल्यावर सुनीलला बरं नव्हतं. याबाबत मी त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की, तो डिप्रेशनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याच्याकडे फार कामदेखील नव्हतं. एकदा कपिल आणि सुनील माझ्या घरी आले, पण त्यावेळी मी त्याला ओळखलं नाही. पण त्याने खूप मेहनत घेतली आणि आज आम्ही खूप चांगले मित्र आहोत.”

यानंतर तिनं सांगितलं, “एक वेळ अशी होती, जेव्हा शोमधील क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह सुनीलला शोमधून बाहेर काढू इच्छित होते; कारण त्यांना वाटत होतं की तो चांगलं काम करत नाहीय. जेव्हा सुनील शोमध्ये आला, तेव्हा तो शांत होता; त्यामुळे क्रिएटिव्ह टीमला वाटलं की त्याला शोमध्ये स्थान मिळवता येणार नाही. त्याला बाहेर काढणं योग्य होईल. त्यावर मी त्यांना सांगितलं की, ‘तो खूप चांगला अभिनेता आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा.”

सुनील ग्रोवर इन्स्टाग्राम पोस्ट

सुनील ग्रोवर कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसला आहे. मात्र, २०१७ मध्ये एक वाद झाला आणि त्यानंतर सुनील ग्रोवरने हा शो सोडला. वादाचे कारण असे होते की, कपिल शर्माने विमानप्रवासादरम्यान सुनीलला चुकीच्या पद्धतीने वागवले होते.

२०१७ मध्ये ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत, कपिल शर्माने विमानातील वादावर खुलासा केला होता. त्याने सांगितलं, “मी मान्य करतो आमच्यात बिनसलं होतं आणि त्याची मी खूप मोठी किंमत चुकवली. पण, जे काही सांगितलं गेलं ते अतिशय चुकीचं गेलं आणि खोटं होतं. मी चिडून सुनीलवर चप्पल फेकली होती, असं डिजिटल मीडियामध्ये सांगण्यात आलं होतं.”

यानंतर कपिलनं एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट शेअर करत त्याची जाहीर माफी मागितली होती. जे काही झालं ते अनावधानाने झालं असल्याचं कपिल या पोस्टमध्ये म्हणाला होता. त्यावर सुनीलनंही त्याची माफी स्वीकारत ‘तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकत आलो आहोत, पण इतरांचा आदर राखला पाहिजे’ असं उत्तर दिलं होतं. या वादानंतर ते दोघे पुन्हा एकत्र काम करू लागले. दोघे पुन्हा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले.