मराठमोळी अभिनेत्री अनुषा दांडेकर व अभिनेता करण कुंद्रा रिलेशनशिपमध्ये होते. पाच वर्षांपूर्वी २०२० मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. मनोरंजन क्षेत्रातील एक पॉवर कपल मानले जाणारे अनुषा व करण वेगळे झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दोघांच्या ब्रेकअपची प्रचंड चर्चा झाली होती.
ब्रेकअपनंतर अनुषाने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन दरम्यान, करणपासून वेगळे होण्यामागील कारण अप्रत्यक्षपणे सांगितले होते. “आपण जास्त प्रामाणिकपणा, प्रेम आणि आनंदास पात्र आहोत… आणि त्याची सुरुवात स्वतःवरील प्रेमापासून होते. म्हणून, मी स्वतःला निवडले. बस्स,” असं तिने लिहिलं होतं.
आता ब्रेकअपनंतर बऱ्याच वर्षांनी अनुषाने करणवर विश्वासघाताचा आरोप केला. अनव्हेरिफायड या चॅनेलवरील पॉडकास्टमध्ये अनुषा म्हणाली, “डेटिंग अॅप्सचा माझा सर्वात अविश्वसनीय अनुभव म्हणजे मला त्यावेळी एका डेटिंग अॅपच्या कँपेनसाठी साइन करण्यात आलं होतं. मी त्यावेळी माझ्या बॉयफ्रेंडलाही ती डील मिळवून दिली. ही त्याची आतापर्यंतची सर्वात जास्त मानधन देणारी डील होती. पण जेव्हा आम्ही दोघे त्या कँपेनचा चेहरा होतो, तेव्हा तो त्या अॅपचा वापर इतर मुलींशी बोलण्यासाठी व भेटण्यासाठी करत होता. नंतर मला समजलं की तो अख्ख्या मुंबईतील मुलींसोबत झोपत होता.”
अनुषाने करणचं नाव घेतलं नाही, पण ती करणबद्दलच बोलत असल्याचं म्हटलं गेलं. कारण अनुषा व करण यांनी एका डेटिंग अॅपसाठी एकत्र कँपेन केलं होतं.
करण कुंद्राची पोस्ट
करण कुंद्राने एक पोस्ट केली. ती पोस्ट काही काळाने त्याने डिलीट केली. करण कुंद्राने लिहिलं, “पहाटे ४ वाजता, जेव्हा मी माझ्या बेडवर एकटा पडलेला असतो, तेव्हा मला आश्चर्य वाटतं की बॉलीवूडमधील मोठ्या कुटुंबातील ‘पितृसत्ता नष्ट करणाऱ्या’ महिला कोणताही विचार न करता पुरुषांवर आरोप करतात. त्या टप्प्याटप्प्याने तुमची हिंमत संपवतात. आता मला समजतंय की या देशातील यशस्वी पुरुष देखील स्वतःचे आयुष्य का संपवतात, कारण या जागरूक महिलांसाठी कोणीही जबाबदार नाही.”
करणने पुढे लिहिलं, “तीन तासांत ८७ लेख, आणि ते सगळे कशासाठी? पॉडकास्ट विकण्यासाठी? आपल्या देशातील तरुण-तरुणींना हीच प्रेरणा दिली जात आहे का? आज, या क्रूर उच्चभ्रू महिला काहीही बोलू शकतात आणि त्यामुळे त्यांचं कौतुक केलं जातं, पण माझ्यासारख्या पुरुषांना जाण्यासाठी कोणतीच जागा नाही. आम्ही आमच्या कुटुंबांपासून दूर राहून कठोर परिश्रम करतो, पण कोणीही आम्हाला पाठिंबा देत नाही. तुमचे तेजस्वी व्यक्तिमत्व फिके होते आणि तुम्ही ‘न्यायासाठी…’ फक्त हॅशटॅग उरता.”
करण व अनुषा एकत्र असताना त्यांचे खूप चाहते होते. दोघे एकमेकांबरोबर फिरायला जायचे. सुंदर, रोमँटिक फोटो शेअर करायचे. त्यांनी एकत्र एमटीव्हीचा शो ‘लव्ह स्कूल’ (२०१६-२०१९) होस्ट केला होता. दोघेही या शोमध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांना मार्गदर्शन करायचे. अनुषापासून ब्रेकअप झाल्यावर करण अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला डेट करतोय. दुसरीकडे अनुषा दांडेकर सिंगल आहे. पण तिचं नाव मराठी अभिनेता भूषण प्रधानशी जोडलं जातंय. दोघांनी एकत्र एक सिनेमा केला होता.