Kaun Banega Crorepati Farmer Won 50 rs Lakh : ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. अनेक वर्षांपासू हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. बॉलीवूडचे महानायक म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. मनोरंजनासह प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालण्याचं कामही या शोद्वारे होतं.
आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत आपल्या करोडपती बनण्याच्या स्वप्नाचा प्रवास केला आहे. या कार्यक्रमात अनेक क्षेत्रांतील स्पर्धक सहभाग घेताना दिसतात. अशातच नुकत्याच झालेल्या भागात नांदेडच्या एका शेतकऱ्याने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभाग घेतला होता.
मंगळवारच्या भागात नांदेड जिल्ह्यातील कैलास रामभाऊ कुंटेवाद ’कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाले होते आणि यावेळी त्यांनी हॉट सीटवर बसून सर्वांची मनं जिंकली. यावेळी त्यांनी सलग १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देत ५० लाख रुपये जिंकले. त्यामधून अमिताभ बच्चन यांनी कैलास यांचं कौतुक केलं.
पुढे ५० लाखांनंतरच्या म्हणजेच एक कोटी रुपयांचा प्रश्न आला तेव्हा कैलास यांनी उत्तर देण्यासाठी ‘लाइफलाइन’ वापरली. आधी त्यांनी आधी ‘व्हिडीओ कॉल अ फ्रेंड’ ही लाइफलाइन वापरली; पण तरीही उत्तराबद्दल शंका वाटत असल्यानं पुढे त्यांनी ‘५०:५०’ लाइफलाइनचा वापर केला. पण, तरीसुद्धा त्यांना योग्य उत्तराची शंका होतीच. त्यामुळे त्यांनी धोका न पत्करता, शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपये इतकी रक्कम जिंकली.
एक कोटीच्या प्रश्नाचं योग्य उत्तर कैलास यांना देता आलं नसलं तरी त्यांनी ५० लाखांपर्यंत कोणतीही मदत न घेता, प्रश्नोत्तरांचा हा खेळ अगदी यशस्वीरीत्या खेळला. त्यामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. अमिताभ यांच्यासह प्रेक्षक कैलास यांचंही कौतुक करीत आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती भवनात ‘इन्व्हेन्शन ऑफ द प्रिंटिंग प्रेस’ हे विवियन फोर्ब्स यांचे चित्र कोणाला दर्शवते? हा एक कोटीचा प्रश्न असा होता. या प्रश्नासाठी A. योहान फुस्त, B. विल्यम कॅक्स्टन, C. जोहान्स व D. रिचर्ड एम असे उत्तराचे पर्याय होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होते B. विल्यम कॅक्स्टन. विल्यम कॅक्स्टन हे १५ व्या शतकात इंग्लंडमध्ये पहिले छापखाना आणणारे व्यापारी, लेखक व छापाकार होते. त्यांच्या कार्यामुळे इंग्रजी साहित्य लोकांपर्यंत पोहोचले.
या भागात अमिताभ बच्चन यांनी कैलास यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माहिती दिली. कैलास हे शेती करून महिन्याला साधारण ३,००० रुपये कमावतात. ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते असून, आपल्या दोन मुलांना क्रिकेटपटू बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे ते आजवर योग्य प्रशिक्षण देऊ शकले नव्हते. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून ते आता मुलांना क्रिकेट अकॅडमीत घालणार आहेत.