एखादा चित्रपट किंवा मालिकेचे जेव्हा शूटिंग होत असते, त्यावेळी अनेक गोष्टी घडत असतात. काही मजेशीर घटना असतात, काही वेळा ओळी विसरल्या जातात. शूटिंगदरम्यान काय होत असते, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना इच्छा असते. आता अभिनेत्री कविता मेढेकर(Kavita Medhekar) यांनी एका यूट्यूब चॅनेलबरोबर साधलेल्या संवादादरम्यान असाच एक किस्सा सांगितला आहे. सध्या अभिनेत्री झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा'( Tula Shikvin Changlach Dhada) या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या कविता मेढेकर?

अभिनेत्री कविता मेढेकर यांनी नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’ या यूट्यूब चॅनेलबरोबर नुकताच संवाद साधला. मालिकेत चारुलता व चारुहास यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. या बाबतीत त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. लग्नानंतर इतकी तयार झाली आहेस का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटले, “प्रत्यक्ष माझ्या लग्नात मी इतकी तयार झालेच नव्हते. कारण- कविता म्हणून मी इतकी तयार झाले नव्हते. खूपच साधी होते. पण, मला असं वाटतं की, मालिकेमध्ये तुम्हाला तुम्ही जे नसता, ते साकारायला मिळतं आणि ती गंमत असते. एरवी मी इतकी नटणार नाही. पण, मालिकेत एवढं नटताना, स्वत:कडे बघताना छान वाटतंय.”

मालिकेतील लग्न वेगळं असतं, त्याच्या शूटिंगमध्ये सातत्य ठेवणंदेखील कठीण असतं. त्यावर बोलताना कविता मेढेकर यांनी म्हटले, “मला फार ताण येतो या गोष्टींचा. कारण- इतक्या गोष्टी असतात. मी आता पूर्ण तयार झाली आहे. मी म्हटलं माझं डेकोरेशन पूर्ण झालंय ना बघा. सगळं आहे ना बघा. नथ वगैरे. तरी माझी ती हेअरड्रेसर आहे ना ती म्हणाली की, मुंडावळ्या राहिल्या आहेत. म्हणजे एखादी गोष्ट राहून चालत नाही. म्हणजे मला अजून आठवतंय की, आमच्या मालिकेदरम्यान असं झालेलं एकदा. भुवनेश्वरी खूप दागिने वगैरे घालायची आणि त्यात नथही असायची. नथ आपण सतत घालू शकत नाही म्हणून मी ती काढून ठेवायचे. आम्ही जवळजवळ दीड तास शूटिंग केलं. दीड तासानंतर लक्षात आलं की, भुवनेश्वरीनं नथ घातली नव्हती. चूक कोणाचीच नव्हती आणि म्हटलं तर सगळ्यांचीच होती. त्या दिवसापासून ठरवलं की, माझी नथ, माझी जबाबदारी. त्यानंतर मी परत ते दीड तासाचं मास्टर शूट केलं.”

पुढे बोलताना कविता मेढेकर यांनी म्हटले की जशी प्रेक्षकांना आजच्या भागात काय होणार याची उत्सुकता असते, तसंच सेटवर आल्यानंतर स्क्रिप्ट वाचल्यानंतर कळतं की, पुढे काय होणार आहे. ही सगळी मजा, आनंद यांच्यापलीकडे जाऊन आता आपल्याला सादर करायचं आहे. ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचं एक वेगळं दडपण असतं. कारण- ते तुमचं खरं स्किल आहे. मला नेहमी वाटतं की, आपण या क्षेत्रात आहोत, जे तुमचं कामही आहे; ते तुम्हाला आनंदही देतं.

हेही वाचा: अमिताभ बच्चन जास्त पैसे कमवायला जायचे ‘या’ ठिकाणी, वडिलांनी पत्र लिहून दिला होता ‘हा’ सल्ला

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavita medhekar reveals during shooting of tula shikvin changlach dhada she forgot to wear nose ring had to reshoot scene nsp