Khulta Kali Khulena Fame Mayuri Deshmukh : ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका छोट्या पडद्यावरील एक काळ गाजवलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. आजही अनेक जण पुन्हा मालिकेचे एपिसोड पाहताना दिसतात. या मालिकेचा मोठा चाहतावर्गही आहे. ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेत अभिनेत्री मयूरी देशमुख व अभिनेता ओमप्रकाश शिंदे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

मालिकेतील या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतून पहिल्यांदाच ओमप्रकाश व मयूरी यांनी एकत्र काम केलं होतं. यामध्ये त्यांच्यासह अभिनेत्री अभिज्ञा भावेनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अशातच नुकतीच या तिघांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी मालिकेतील अनेक किस्से आणि गमती जमती सांगितल्या आहेत.

ओमप्रकाशने या मुलाखतीमध्ये मयूरीबरोबरच्या एका सीनचा किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला, “मेकअप रुममध्ये मी, मयूरी, अभिज्ञा आम्ही सगळे डान्सची रिहर्सल करत होतो, तेव्हा आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत होतो. तो कपल डान्स असल्याने मी, मयूरी आम्ही दोघे एक रोमँटिक स्टेप करत होतो. मी तिच्या मागे होतो आणि ती माझ्या पुढे आम्ही डान्ससाठी हातात हात घेतले होते.”

ओमप्रकाश पुढे म्हणाला, “तेव्हा ती स्टेप करताना चुकून माझ्या गालाचा तिच्या गालाला स्पर्श झाला आणि तिला वाटलं मी मुद्दाम केलं की काय म्हणून तिने हात झटकला आणि माझ्या कानाखाली मारली.” यावर मयूरी म्हणाली, “मी नवीन माणसांना हाय हॅलो पण करत नाही, आधी नमस्कारच करते; मिठी तर दूरची गोष्ट…. त्यामुळे चुकून माझा असा गैरसमज झाला.”

ओमप्रकाश व मयूरी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ओमप्रकाश शिंदेने ‘काळी माती’, ‘अथांग’, ‘यू टर्न’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासह त्याने ‘खुलता कळी खुलेने’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘मुलगी झाली हो’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे; तर मयूरीने या मालिकेव्यतिरिक्त अनेक चित्रपटांतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून झळकली होती. तिच्या भूमिकेमुळे या मालिकेत नवीन ट्वविस्ट आला होता, तर यातील तिच्या कामाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं.

दरम्यान, ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका १८ जुलै २०१६ रोजी प्रदर्शित झाली होती. या मालिकेमुळेच अभिनेत्री मयूरी देशमुख व ओमप्रकाश शिंदे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आले. आजही या मालिकेचे प्रेक्षक या दोघांना पुन्हा एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.