Kiran Mane in Lai Avadtes Tu Mala: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने हे घराघरांत पोहोचले. त्याबरोबरच ‘बिग बॉस मराठीच्या ४’च्या पर्वातदेखील किरण माने सहभागी झाले होते. या पर्वातून त्यांनी त्यांच्या खेळाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
“कॅमेऱ्यात माणसाऐवजी त्याचा धर्म दिसायला लागतो”
आता किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी लय आवडेतस तू मला या मालिकेत ते दिसणार असल्याचे नमूद केले आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, “पुन्हा शुटिंग सुरू. वैयक्तिक दुःख काळजात दाबून गेले १५ दिवस पायांना भिंगरी बांधल्यासारखा महाराष्ट्रभर फिरलो. आता प्रबोधनाच्या कामातून थोडा ब्रेक घेतो. हा कॅमेरा मला रिफ्रेश करतो. हे अद्भुत यंत्र आहे.
“जेव्हा कॅमेरा नितळपणे फक्त माणसं आणि त्यांच्या भावभावना टिपतो. कथेत कितीही उलथापालथी होऊ देत, शेवटी बघणाऱ्याच्या काळजातली नाती, प्रेमभावना आणि मानवता यांवर फोकस करतो. तेव्हा ती कलाकृती होते. कॅमेऱ्यात माणसाऐवजी त्याचा धर्म दिसायला लागतो आणि प्रेक्षकांमध्ये द्वेषाची कीड पेरली जाते. माणुसकी आउटफोकस होते. तेव्हा ती विकृती ठरते. “
एक अभिनेता म्हणून आजवर कधीही विकृतीचं उदात्तीकरण करण्याची लाचार वेळ स्वत:वर येऊ न दिल्याचा अभिमान आहे. ‘लई आवडतेस तू मला’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान कॅमेऱ्यात ‘फोकस’ चेक करतानाचा हा एक क्षण”, असे त्यांनी या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
अभिनयाबरोबरच किरण माने सोशल मीडियावर सक्रिय असतात. राजकीय सामाजिक विषयांवर परखडपणे ते व्यक्त होताना दिसतात. त्यांचे चाहते त्यांच्या या परखड स्वभावामुळे त्यांच्यावर प्रेम करताना दिसतात. आता लई आवडतेस तू मला या मालिकेतील त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.
लई आवडतेस तू मला ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत तन्मय जक्का आणि सानिका मोजर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी सरकार आणि सानिका या भूमिका स्वीकारल्या आहेत. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे.