Kranti Redkar Share Househelp’s Funny Video : अलीकडे सोशल मीडिया हेसुद्धा मनोरंजनाचं एक उत्तम साधन झालं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कंटेट क्रिएशनद्वारे स्वत:चं एक वेगळं करिअर सुरू केलं आहे. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मंडळीसुद्धा सोशल मीडियावर कंटेट क्रिएशन करताना दिसतात. मनोरंजन क्षेत्रात काम करण्याबरोबरच अनेक जण सोशल मीडियाद्वारेही त्यांच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात.

सोशल मीडियाद्वारे आपले अनुभव किस्से, प्रसंग वा गमतीजमती शेअर करणं काही कलाकारांना आवडतं आणि त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो शेअर करीत असते. तसेच लेकींचे अनेक मजेशीर व्हिडीओसुद्धा ती शेअर करताना दिसते. तसेच क्रांती अनेकदा तिच्याबरोबर घडलेले काही प्रसंगं किंवा मजेशीर किस्से आपल्या खास शैलीत शेअर करीत असते.

क्रांतीचे हे मजेशीर व्हिडीओ चाहत्यांच्याही विशेष पसंतीस उतरताना दिसतात. अशातच क्रांतीने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एका कार्यक्रमानंतर रात्री उशिरा घरी आलेल्या क्रांतीला तिच्या घरातील मदतनीस महिलेने पहिल्यानंतरच्या प्रतिक्रियेवर क्रांतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मदतनीस महिलेची हुबेहूब नक्कल करीत क्रांतीने तो प्रसंग सांगितला आहे.

या व्हिडीओमध्ये क्रांती असं म्हणते, “मला विश्वास बसत नाही की, ही गोष्ट मी अजून तुमच्याबरोबर शेअर कशी केली नाही. त्या दिवशी माझा पुण्यात एक कार्यक्रम होता, ज्यासाठी मी गेले होते. तो कार्यक्रम संपवून घरी यायला मला रात्रीचे दोन-अडीच वाजले. त्यासाठी मी छान अशी तयार झाले होते.”

पुढे ती सांगते, “पांढरी साडी, गजरा वगैरे, असं सगळं केलं होतं. तर मी घरी आल्यानंतर दारावरची बेल वाजवली, तर आमच्या अॅनीने दरवाजा उघडला. मीसुद्धा तिला त्रास नको म्हणून हातात ट्रॉफी, शाल घेत आतमध्ये शिरले आणि मी माझ्या खोलीत गेले. थोड्या वेळाने पुन्हा बेल वाजली. तेव्हा दुबे चावी द्यायला आले होते ते मला कळल्यानं मी अ‍ॅनीला त्रास होईल म्हणून पटापट जाऊन दरवाजा उघडला चावी घेतली आणि आवाज नको म्हणून हळूच दार लावलं.”

त्यानंतर क्रांती म्हणाली, “दार लावल्यानंतर वळले आणि तेवढ्यात अ‍ॅनी आली होती. तिनं मला एका बंद दरवाजातून आत येताना पाहिलं. तिला वाटलं, ही म्हणजे मी तर १० मिनिटांपूर्वीच आत आली आहे; मग आता ही बाई कोण? पांढऱ्या साडीतली ही बाई कोण? त्यानंतर आमची अ‍ॅनी खूपच घाबरली. ती मला सारखं दीदी… दीदी… अशी हाक मारत होती. तरीही तिला विश्वास बसत नव्हता.”

त्यानंतर क्रांतीनं सांगितलं, “तिचा विश्वास बसत नव्हता; मग मी तिला “अ‍ॅनी… मी आहे, डोळे उघड…” असं म्हटलं. त्यावर ती मला म्हणाली, “दीदी… तुम्ही तर मगाशीच आल्या होता ना?”. त्यावर मी तिला उत्तर देत म्हणाले, “हो मी मगाशीच आले; पण आता दुबेजी चावी घेऊन आले. त्यामुळे पुन्हा आले होते. आता जाऊन गप्प झोप जा.” त्यानंतर ती गप्प निघून गेली. तर अशी ही आमची अ‍ॅनी…”

दरम्यान, क्रांतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही लाइक्स आणि कमेंट्स करीत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.