Kunickaa Sadanand and Kumar Sanus affair: बिग बॉसच्या १९ व्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. या पर्वातील सर्वच सदस्य विविध पद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. या पर्वात गायक, कलाकार, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन असे विविध कला क्षेत्रातील व्यक्ती स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

अभिनेत्री कुनिका सदानंददेखील या पर्वात सहभागी झाल्या आहेत. इतर स्पर्धकांच्या बरोबरीने त्या टास्कमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. काही वाद विवाददेखील होताना दिसत आहेत. तान्या व कुनिका यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता मात्र त्या बिग बॉसमधील खेळामुळे नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

“ज्यावेळी माझ्या गर्लफ्रेंड्स होत्या तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड्स…”

बिग बॉसमध्ये जाण्याआधी त्यांनी सिद्धार्थ कननला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी कुमार सानू यांच्याबरोबरच्या रिलेशनबद्दल वक्तव्य केले होते. आता त्यांचा मुलगा आयान लालने आई कुनिका सदानंद यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. ज्यावेळी माझी आई कुनिका व कुमार सानू यांचे अफेअर सुरू होते, तेव्हा माझा जन्म झाला नव्हता. पण, जेव्हा मला समजायला लागले, त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल माहीत झाले.

आयानने नुकतीच सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत आयानने त्याच्या आई-वडिलांचा जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा माझी आई खूप एकटी पडली होती, तिला कोणीतरी जोडीदार पाहिजे होता. तिच्या आयुष्यात अनेक पुरुष आले आणि गेले. आयान म्हणाला, “त्यातील काहीजणांमध्ये पती होण्याची वैशिष्ट्ये होती, तर काहीजणांमध्ये वडील होण्याची वैशिष्ट्ये होती. पण, त्यांचे नाते टिकले नाही.”

जेव्हा त्याला त्याची आई कुनिका आणि कुमार सानू यांच्या नात्याबद्दल विचारले, तेव्हा आयान म्हणाला, “मला जितके त्यांच्या नात्याबद्दल माहीत आहे, त्यांचे नाते खूप टॉक्झिक होते.” कुमार सानूबरोबरच्या आईच्या नात्याबद्दल त्याला केव्हा समजले, यावर आयान गमतीत म्हणाला, “मला जेव्हा समजले की माझी आई दिवसभर त्यांची गाणी गाते.” पुढे तो म्हणाला, “गायक म्हणून तिला त्यांचे कौतुक आहे. आजही ती त्यांची गाणी गाते. लोक म्हणतात की त्यांचे अफेअर २७ वर्षे होते. पण, जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा माझी आई २७ वर्षांची होती. त्यांचे नाते काही वर्षे टिकले आणि ती ३५ वर्षांची असताना तिने मला जन्म दिला.”

“माझी आई कलाकारांवर प्रेम करते. त्याशिवाय ती कोणाच्याही प्रेमात पडत नाही. जेव्हा मी त्यांच्याबाबत गूगल केले आणि मी माझ्या आईला त्याबद्दल विचारले तर ती मला म्हणाली, की तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा व्यक्ती होता. मी त्याच्याकडे माझा जोडीदार म्हणून बघत होते. प्रत्येकाने तसे प्रेम एकदातरी अनुभवले पाहिजे, ते टॉक्झिक नाते होते.”

दरम्यान, कुमार सानू हे भारतातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत. कुनिका यांनीदेखील बिग बॉसमध्ये जाण्याआधी कुमार सानू यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.