‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेचा दुसरा सीझन २५ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत स्मृती इराणी पुन्हा एकदा ‘तुलसी’ या भूमिकेत आहे. तर हितेन तेजवानी, अमर उपाध्याय आणि इतर अनेक कलाकारही या मालिकेत त्यांची जुनी पात्रे साकारताना दिसत आहेत. या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या शगुन शर्माने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत शगुनने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितलं. शगुनने प्रेमाची कबुली दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे शगुन मालिकेत तिच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याच्याच प्रेमात आहे. शगुन शर्मा तिचा सह-कलाकार अमन गांधीला डेट करत आहे. अमन ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मध्ये शगुनच्या धाकट्या भावाची भूमिका साकारत आहे. बहीण-भावाची भूमिका साकारण्यासाठी हा शो साइन करण्यापूर्वी दोघांनी यावर चर्चा केली होती, असंही शगुनने नमूद केलं.

शगुन शर्माने दिली प्रेमाची कबुली

शगुन तिच्या व अमनच्या नात्याबद्दल म्हणाली, “या अफवा नाहीत, हे खरं आहे. पण आम्ही मालिकेत काम सुरू केल्यावर डेटिंग करायला सुरुवात केली नव्हती; आम्ही त्याआधीपासून एकत्र होतो.” एका पॉडकास्टमध्ये अमनने शगुनबरोबर एक वर्षापेक्षा जास्त काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. शगुनआधी अमनची ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ मधील रितिक विरानीच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. त्यानंतर शगुनला मालिका ऑफर झाली. शगुनने ऑफर आल्यावर अमनशी याबद्दल चर्चा केली होती. खऱ्या आयुष्यात बॉयफ्रेंड असलेला अमन शोमध्ये तिच्या भावाची भूमिका साकारण्यास तयार आहे की नाही, असं तिने विचारलं होतं.

शगुन-अमनबद्दल सेटवर कुणालाच माहीत नव्हतं

सुरुवातीला सेटवर कोणालाही शगुन आणि अमनच्या नात्याबद्दल माहिती नव्हती, परंतु दोन महिन्यांनंतर या जोडप्याने स्वतःच सर्वांना अधिकृतपणे सांगितलं. काही आठवड्यांपूर्वी शगुन अमनच्या पॉडकास्टमध्ये व्यक्त झाली होती. “मी इथे असण्याचं एक मोठं कारण म्हणजे हा माणूस आहे. आम्ही या मालिकेबद्दल खूप चर्चा केली होती. अमन आणि माझ्या बहिणीचं म्हणणं होतं की मी ही भूमिका करावी,” असं शगुन म्हणाली होती.

अमनबरोबर वेळ घालवता येतो- शगुन

अमनबरोबर एकत्र काम करण्याबद्दल शगुन म्हणाली, “त्याच्या बहिणीची भूमिका पडद्यावर साकारण्याचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही. आमचे असे एकत्र सीन नसतात, ज्यात आम्ही भाऊ-बहीण आहोत, हे अधोरेखित करायचं असतं. माझी आवडती गोष्ट म्हणजे आम्हाला रोज एकत्र जेवण करायला मिळतं आणि एकत्र जास्त वेळ घालवता येतो. या मालिकेमुळे आमच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली आहे.”

शोमध्ये शगुन नकारात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे अमनला अनेकदा विचारलं जातं की तो तिला का डेट करतोय? शोमधील तिच्या भूमिकेसाठी शगुनला सोशल मीडियावरून तिला द्वेषाचा सामना करावा लागतो.