Lagnanantar Hoilach Prem Maha Episode : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. काव्याच्या मनात हळुहळू पार्थविषयी आपुलकी निर्माण व्हायला लागली आहे. याचबरोबर ती अभ्यासाकडे सुद्धा लक्ष केंद्रीत करताना दिसतेय. पण, या दोघांच्या नात्याला लवकरच एक वेगळं वळण मिळणार आहे.
काव्या नेहमीप्रमाणे लायब्ररीमध्ये अभ्यास करायला जाणार आहे. पण, यावेळी एक मोठी दुर्घटना घडते. या लायब्ररीला भीषण आग लागते आणि काव्याला पार्थने गिफ्ट दिलेलं घड्याळ या आगीत तिच्या हातून निसटून पडतं. पार्थने प्रेमाने दिलेली भेटवस्तू अशाप्रकारे आपल्यापासून दूर होणार हे काव्याला सहन होत नाही आणि ती घड्याळ आणण्यासाठी पुन्हा लायब्ररीत जाते. तोपर्यंत आग वाढत जाते, काव्याचा श्वास कोंडतो आणि ती बेशुद्ध होते.
लायब्ररीमध्ये आग लागल्याची माहिती पार्थपर्यंत पोहोचते. तो प्रचंड घाबरतो आणि तसाच काव्याला भेटण्यासाठी येतो. काव्या आगीत अडकल्याचं पाहून पार्थ प्रचंड अस्वस्थ होतो. काव्या बेशुद्ध झाल्याचं पाहून पार्थ कसलाही विचार न करता आगीत उडी घेतो. आपल्या अंगावरचा कोट काढून काव्याभोवती गुंडाळतो आणि तिला आगीतून सुखरूप बाहेर काढतो.
काव्या सुखरूपपणे लायब्ररीच्या बाहेर जाते पण, इतक्यात पार्थच्या अंगावर लायब्ररीमधील जळतं स्टँड पडतं. पार्थला आगीत होरपळताना पाहून काव्या जोरात किंचाळते असं प्रोमोच्या शेवटी पाहायला मिळत आहे. आता या मोठ्या संकटातून पार्थचा जीव वाचणार का? पार्थच्या अपघाताचा दोष मानिनी पुन्हा एकदा काव्याला देईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा हा विशेष भाग १२ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केला जाईल. नेटकरी सुद्धा हा थरारक प्रोमो पाहून थक्क झाले आहेत. मात्र, यामुळे पार्थ-काव्याच्या नात्याला नवीन दिशा मिळून त्यांच्यामधलं प्रेम बहरत जाईल असा विश्वास काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केला आहे.
“काव्यार्थ ( काव्या व पार्थ ) यांच्या रिलेशनशिपचा हा मोठा टर्निंग पॉइंट असेल”, “जबरदस्त प्रोमो”, “आता काव्याचं काही खरं नाही…मानिनी हिला ठेवणार नाही”, “प्रोमो बघून अंगावर काटा आला…जबरदस्त” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.